नाशिक : समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर धडकून तीन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. शिर्डी इथून साईबाबांचं दर्शन घेऊन परतत असताना मंगळवारी सायंकाळी पिंपरी फाट्य़ावर हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी नवी मुंबईजवळील खालापूर येथील रहिवासी आहेत. गीता रमेश अग्रवाल, निर्मय अनुज गोयल, अनुज रमेश गोयल, यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेशचंद्र अग्रवाल, मीती अनुज गोयल आणि दिव्यांशी अनुज गोयल हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कार दुभाजकावर धडकल्यानं झाला भीषण अपघात : नवी मुंबई इथलं खालापूर भागातील गोयल आणि अग्रवाल कुटूंब शिर्डी इथं स्विफ्ट कारमधून दर्शनासाठी गेलं होतं. शिर्डीहून परतत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा इथं भरधाव वेगातील कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली. या अपघातात गीता रमेश अग्रवाल (72), निर्मय अनुज गोयल (16), अनुज रमेश गोयल (52, चालक), यांचा जागीच मृत्यू झाला. रमेशचंद्र अग्रवाल (80), मीती अनुज गोयल (45) आणि दिव्यांशी अनुज गोयल (21) हे गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमींना रुग्णवाहिकेतून घोटीजवळील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील अपघात चिंतेचा विषय : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील काही काम बाकी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात महामार्गावरुन वाहतूक होत असल्यानं अपघाताच्या घटनाही सातत्यानं घडत आहेत. देशातील रस्तेमार्गाचं विस्तारीकरण होत आहे. मात्र त्याच तुलनेनं वाहनांची संख्याही वाढत आहे. वाढतं दळणवळण हे वाढत्या अपघातांचं कारण बनत असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :