ठाणे : भारतीय संस्कृतीत दुधाला अनन्य साधारण महत्व असून गेल्या काही वर्षात महागाईमुळे गायी म्हशींच्या दुधाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे दूध 80 ते 90 रुपये लिटरनं शहरात विक्री होत आहे. याचाच फायदा घेऊन काही गायी म्हशींच्या गोठ्यांमध्ये झटपट पैसा कमवण्यासाठी बनावट इंजेक्शन आणि औषधे खरेदी करून जादा दूध काढण्यात येण्याचं प्रमाण वाढलं आहे. गाई, म्हशींचं दूध पाणावण्यासाठी तीन जणांनी ऑक्सीटोसीन औषधं अवैधपणे विक्रीसाठी बाळगल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील किडवाईनगरमधून समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. सैफूल माजीद सनफुर्द (27), अशिक लियाकत सरदार (24) अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर लियाकत शेठ असं फरार झालेल्याचं नाव आहे.
गायी म्हशींना जास्त दूध येण्यासाठी ऑक्सीटोसीनचा वापर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिघंही मूळचे पश्चिम बंगालचे असून ते सद्यस्थितीत किडवाईनगरमधील टिचर कॉलनी जवळील जुबेर शेठच्या कारखान्याच्या गाळ्यात राहत आहेत. दरम्यान वरील तिघांनी राहत असलेल्या गाळ्यात गाई, म्हशींचे दूध वाढवण्यासाठी संबंधित विभागाचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना गेल्या महिना भरापासून ऑक्सीटोसिन औषधाची साठवणूक विक्रीसाठी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या ऑक्सीटोसीनचा डोस गाई, म्हशीना दिल्यानंतर ते दूध मानवी आरोग्यास हानिकारक असून त्याचं सेवन केल्यानं श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे अजार, नवजात बाळाना कावीळ, गरोदर स्त्रीला रक्तस्त्राव आणि अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे आजार, त्वचारोग असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
प्रसूती सुरूळीत करण्यासाठी होतो ऑक्सीटॉसिन औषधांचा वापर : ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसूती सुरूळीत करण्यासाठी होत असून त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रिस्क्रीप्शन आणि रजिस्टर फार्मासिस्ट यांची परवानगी आवश्यक आहे. परंतु आरोपी तिघंही ऑक्सिटोसिनचा गैरवापर करून औषधी उत्पादक असल्याचं भासवून त्याची विक्री करत असल्याचं उघड झालं. त्यांच्याकडून 7 लाख 23 हजार रुपये किमतीचा रसायन मिश्रित ऑक्सिटोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे. तिघांवरही ठाणे औषध निरीक्षक (कोकन विभाग) चे सहायक आयुक्त राजेश बाबुराव बनकर यांच्या तक्रारीवरून 24 डिसेंबर रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात भान्यासं तेच्या 123, 318 (4), 274, 276, 3(5) सह प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अंतर्गत कलम 11 (ग) व कलम 12 सह औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनीयम 1940 चे कलम 18 (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली तर त्यांचा फरार साथीदार लियाकत शेठ याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान बनावट इंजेक्शन आणि औषधं तयार कारखान्यासह साठवणूक केलेल्या गोदामावर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं छापेमारी टाकून या गोरखधंद्याचा 6 ऑगस्ट रोजी भांडाफोड केला होता. इम्रान शकील चोटे (28), शाकीब मोहत्तसीम वर्डी (28), शोएब कमालुद्दीन अन्सारी (45),असफी रफिक थोटे (43) या चौघांसह कारखाना मालकावरही भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 12 लाख 40 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे गाई, म्हशींच्या दूध वाढीसाठी ऑक्सीटोसिन इंजेक्शनचा गोरख धंदा करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
हेही वाचा :