मुंबई - अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या 'स्काय फोर्स' या अॅक्शन ड्रामा चित्रपटानं पहिल्या आठवड्याच्या अखेरीस देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या पहिल्या आणि घातक हवाई हल्ल्याची कहानी अशी ओळख तयार झालेल्या या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पहिल्या दिवसापासूनच वाढ झाली. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा उठवत 'स्काय फोर्स'नं पहिल्या तीन दिवसांत ६० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट त्याच्या 'राम सेतू' या चित्रपटाच्या कमाईला मागे टाकत सर्वोत्तम वीकेंड कलेक्शनच्या यादीत सामील झाला आहे.
'स्काय फोर्स'चं तिसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन- निर्मात्यांच्या मतानुसार, 'स्काय फोर्स' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या २ दिवसांत चांगली कामगिरी केली. अक्षय कुमारच्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी १५.३० कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये जवळपास दीड पट वाढ झाली. 'स्काय फोर्स'नं पहिल्या शनिवारी २६.३० कोटी रुपये कमावले. 'स्काय फोर्स'नं रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांत ४२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
सॅकॅनिल्कच्या मतानुसार, 'स्काय फोर्स'नं सर्व भाषांमध्ये रिलीजच्या तिसऱ्या दिवशी भारतात सुरुवातीच्या अंदाजानुसार २७.५० कोटी रुपये कमावले आहेत. अंदाज बरोबर ठरला तर चित्रपटाचं एकूण कलेक्शन ६९.५० कोटी रुपये होईल.
७५ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारसाठी मोठा लाभदायक ठरला आहे. २६ जानेवारी रोजी त्याच्या २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या राम सेतू चित्रपटाला मागे टाकत 'स्काय फोर्स' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट वीकेंड कलेक्शनच्या यादीत समाविष्ट झाला आहे. आकडेवारीनुसार, राम सेतू चित्रपटानं पहिल्या आठवड्याच्या शेवटी ५५.४८ कोटी रुपये कमावले होते.
पहिल्या आठवड्यात ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केलेले अक्षय कुमारचे चित्रपट- मीडियातील उपलब्धस माहितीनुसार, पहिल्या वीकेंडमध्ये ५० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत...
- मिशन मंगल - ९७.५६ कोटी
- केसरी - ७८.०७ कोटी
- २.० - ९७.२५ कोटी
- गोल्ड - ७०.०५ कोटी रुपये
- राम सेतू - ५५.४८ कोटी
- सूर्यवंशी - ७७.०८ कोटी
- गुड न्यूज - ६५.९९ कोटी
- टॉयलेट - एक प्रेम कथा - ५१.४५ कोटी रुपये, अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.
'स्काय फोर्स' चित्रपटाबद्दल- 'स्काय फोर्स' हा २०२५ मध्ये रिलीज झालेला हिंदी भाषेतील अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारतानं केलेल्या हल्ल्यावर आधारित आहे. भारताच्या हवाई दलानं केलेला हा पहिला हवाई हल्ला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'स्काय फोर्स' हा वीर पहाडियाचा पहिलाच चित्रपट आहे. सारा अली खान आणि निमरत कौर यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं बजेट अंदाजे १६० कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांनी संयुक्तपणे केलं आहे.