मुंबई - Shaitaan Release Date : अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'सिंघम 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच वर्षी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मोठे स्टार्सही दिसतील. चाहतेही या चित्रपटाची खूप वाट पाहत आहेत. मात्र अजयच्या आणखी एका चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अजय देवगण लवकरच काळ्या जादूवर आधारित असलेला 'शैतान' या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत आर माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अजय देवगणनं 'X'वर या चित्रपटामधील एक पोस्टर शेअर करत रिलीज डेटची घोषणा केली आहे.
'शैतान' चित्रपट काळ्या जादूवर आधारित :या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यानं सांगितलं, ''शैतान 8 मार्चला थिएटरमध्ये येत आहे.'' हा सस्पेन्स, थ्रिलर हॉरर चित्रपट आहे. भारतात काळी जादू कशी होते आणि याचे परिणाम कसे होतात हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 'शैतान' हा चित्रपट जिओ स्टुडिओ, देवगन फिल्म आणि पॅनारोमा स्टुडिओच्या बॅनरखाली बनवला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करत आहे. 'शैतान' चित्रपटाचं दिग्दर्शन कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक करत आहेत. अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका पहिल्यांदाच 'शैतान'मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.