मुंबई - AMKDT New Release Date: अभिनेता अजय देवगण आणि तब्बू आगामी 'औरों में कहाँ दम था' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी प्रेमकथेवर आधारित असणार आहे. 'औरों में कहाँ दम था'चे दिग्दर्शन नीरज पांडे करत आहेत. या चित्रपटाची नवीन रिलीज डेट आज 6 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता. नीरज पांडे आणि अजय देवगण यांनी सोशल मीडियावर 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. तसंच या चित्रपटाचं नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आलय.
'औरों में कहाँ दम था' चित्रपट कधी होईल रिलीज : नीरज पांडे यांनी यापूर्वी 'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल 26' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. याशिवाय त्यांनी 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' सारखा चित्रपटही बनवला आहे. आता ते पहिल्यांदाच एका प्रेमकहाणीतून आपली प्रतिभा दाखवणार आहेत. 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी मनाचा ठाव घेणारी आहे. 'औरों में कहाँ दम था'मध्ये 20 वर्षे वेगळे राहूनही तब्बू आणि अजय यांच्यातील प्रेम कसे टिकून राहते, याबद्दल दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी तयार केला आहे.