मुंबई - लोकप्रिय पंजाबी स्टार आणि गायक दिलजीत दोसांझचा गेल्या शनिवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये कॉन्सर्ट पार पडला. याठिकाणी सुमारे 35 हजार प्रेक्षक सहभागी झाले होते. दिलजीतच्या चाहत्यांनी इथं त्याच्या गाण्यांना भरभरुन दाद दिली आणि खूप एन्जॉय केलं. दिलजीतच्या कॉन्सर्टचा आवाज स्टेडियमबाहेर दूरदूरपर्यंत पोहोचत होता. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या गाण्यांवर चांगलाच गोंधळ घातला होता हे आता उघड झालं आहे. दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. मैदानावर ठिकठिकाणी दारू आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. एका खेळाडूनं याचा एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यानंतर याला मोठा विरोधचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळाडू दररोज सराव करत असतात. परंतु दिलजीतच्या या कॉन्सर्टनंतर येथे खेळाडूंना सराव करणं कठीण झालं आहे. एका खेळाडूने आपल्या व्हिडिओमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये फिरून प्रत्येक कोपरा दाखवला आहे. याठिकाणी भरपूर कचरा मैदनावर पसरेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही झाल्या प्रकाराबद्दल नाराज झाले आहेत.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा रनिंग ट्रॅक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तेथे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तुटलेल्या खुर्च्या, खाऊन फेकलेले कुजलेले अन्न, पाणी यामुळे येथील परिस्थिती घाणेरडी झाली आहे. अशा परिस्थितीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे खेळाडूंना सराव करता येत नाही. इथं सराव करणारा धावपटू बेअंत सिंगने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यानं स्टेडियमच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
दिलजीतच्या कॉन्सर्टसाठी म्युझिक लेबल सारेगामा आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये करार झाला होता. दिलजीतच्या कॉन्सर्टसाठी हे जवाहरलाल नेहरू स्टेडियम 1 नोव्हेंबरपर्यंत बुक करण्यात आलं होतं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम आता पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहे.
काय म्हणाला धावपटू बेअंत सिंग? - जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सराव करणारा खेळाडू बेअंत सिंग यानं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. गाण्याच्या कार्यक्रमासाठी मैदान दिल्यानंतर काय दुरावस्था होते हे त्यानं सुरुवातीला दाखवलंय. यामध्ये सर्वत्र दारुच्या बाटल्या पसरल्याचं दिसत आहे. मैदानावर फेकण्यात आलेला कचरा सर्वत्र दिसत आहे. अशामध्ये मैदान 10 दिवस बंद ठेवण्यात येते. त्यामुळे खेळाडूंना सराव करता येत नसल्याचं दुःखही त्यानं बोलून दाखवलंय.