डोंबिवली (ठाणे) : बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. ४२ वर्षीय बापाने त्याच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे बापाच्या या घृणास्पद कृत्यास विरोध केल्यानं नराधम बापानं पीडित मुलीच्या कपाटातील शाळेची पुस्तकं, कपडे जाळून टाकली आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दखल करून नराधम बापाला अटक केल्याची माहिती, साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप यांनी दिली.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी आपल्या ३६ वर्षीय आई आणि ४२ वर्षीय आरोपी बापासोबत डोंबिवली पूर्वेकडील एका हायप्रोफाईल सोसायटीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहाते. काही दिवसांपासून नराधम बापाची नजर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पडली होती. त्यातच ३० डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच असल्याचं पाहून नराधम बापाने पीडित मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घडलेल्या प्रकाराला पीडित मुलीने कडाडून विरोध केला होता, असं मानपाडा पोलिसांनी सांगितलं.
शाळेची पुस्तके आणि कपडे जाळून टाकले : दुसरीकडं पीडित मुलगी या घटनेमुळं भयभीत होऊन तिने आई घरी आल्यानंतर तिला तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. ही घटना ऐकून आईला धक्काच बसला. त्यानंतर पीडितेच्या आईने नराधम बापाला जाब विचारला असता दोघा नवरा बायकोमध्ये वाद झाला. या वादाच्यावेळी संतप्त झालेल्या आरोपीने पत्नीला आणि पीडित मुलीला मारहाण केली. शिवाय पीडित मुलीने घडला प्रकार घरात सांगितला म्हणून ५ जानेवारी रोजी पीडित मुलीचे शाळेची पुस्तके आणि तिचे कपडे जाळून टाकले. अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वाती जगताप यांनी दिली.
नराधम बापाला अटक : या दोन्ही घटनेनंतर आईने पीडित मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ ११५(२) ३२४(२) सह पोक्सोचे कलम ८आणि १० तसंच जे. जे. कायद्याचं कलम ७५ प्रमाणे ५ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे नराधम बापाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर अटक आरोपीला आज न्यायालयात हजर केलं असता अधिकची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप करत आहेत.
हेही वाचा -