पुणे : चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसचा (HMPV) संसर्ग वेगानं वाढल्यानंतर भारतात देखील रुग्ण दिसून येत आहेत. देशात सर्वप्रथम बंगळुरूमध्ये दोन मुलांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर हळूहळू याचे रुग्ण वाढत असून आता राज्यात देखील या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. असं असताना आता याबाबत पुणे महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये साडेतीनशे बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी दिली.
नेदरलँडमध्ये लागला विषाणूचा शोध : याबाबत महापालिकेच्या आरोग्य प्रमुख नीना बोराडे म्हणाल्या, "एचएमपीव्ही हा विषाणू नवीन नसून जुना आहे. २००१ मध्येच नेदरलँडमध्ये या विषाणूचा शोध लागला होता. त्यामुळं याबाबत पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. तसंच या विषाणूच्या संदर्भात राज्य शासनाकडून ज्या काही सूचना देण्यात आल्या आहेत, त्याबाबतच्या सूचना महापालिकेकडून सर्वच यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तसंच या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे".
खबरदारीचा उपाय म्हणून राखीव बेडची सोय : पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेडची व्यवस्था असून हे रुग्णालय विशेष संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं या रुग्णालयातील व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून हे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तसंच या विषाणूची सर्वत्र चर्चा होत असली तरी त्याला घाबरु नये, नेहमीप्रमाणे आपण काळजी घ्यावी. कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर वापरले त्याप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे. तसंच पुणे विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी सध्यातरी केली जात नाही. परंतु याबाबत बैठक घेवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाईल असं यावेळी बोराडे म्हणाल्या.
हेही वाचा -