मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीबद्दल सतत बोलत आली आहे. बॉलिवूड नेपोटिझमचा विषयाला तिनेच पहिल्यांदा सुरू केला. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये तिने करणवरच नेपोटिझमचा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. करण जोहर नेहमी स्टार किड्सना संधी देत असतो. आजवर अनेक स्टार्सची मुलं, मुली त्याने या क्षेत्रात लॉन्च केली आहेत. त्यांच्यासाठी चित्रपटांची निर्मिती त्यानं केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात अभिनय कारकिर्द करण्यासाठी संघर्षशील असलेल्या गुणी कलाकारांना संधी मिळत नाही असा सूर फिल्म इंडस्ट्रीत जोर धरु लागला.
नेपोटिझमच्या चर्चेला खऱ्या अर्थाने जास्त हवा मिळाली ती सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर. त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले, त्याला इथले प्रस्थापित निर्माते सहकार्य करण्याऐवजी त्रास देतात अशा अर्थाच्या चर्चांना त्यांच्या मृत्यूनंतर उधाण आले होते. अर्थात या सर्वामध्येही कंगना रणौत आघाडीवरच होती. ती सतत फिल्म इंडस्ट्रीतील 'आतले' आणि 'बाहेरचे' या विषयावर बोलत असते. ती स्वतःला 'बाहेर'ची मानते आणि प्रस्थापित निर्मांत्याच्या विरोधात नेहमी आगपाखड करत असते.
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गडकरी घराणेशाहीवर भाष्य करताना दिसतात. कंगनाने गडकरींचा संदर्भ देत लिहिले की, "मी नेपोटिझम नावाचा सर्वात मोठा वादविवाद पेटवून ६ वर्षे झाली आहेत. इतक्या लोकांना याबद्दल विचारण्यात आले, मला पहिल्यांदाच या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले." व्हिडिओमध्ये गडकरी जे बोलत आहेत त्यातील त्यांचा दृष्टीकोन कंगनाला पटला आहे.