मुंबई -सिद्धार्थ जाधवनं मराठी चित्रपटससृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा अभिनय हा अनेकांना पसंत पडतो. त्यानं मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळ नाव निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. सिद्धार्थनं आपल्या अभिनयाची सुरुवात डीडी सह्याद्रीच्या 'एक शून्य बाबुराव' या मालिकेतून केली. 2004 मध्ये, त्यानं केदार शिंदे यांच्या 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्याला 'जत्रा' चित्रपटाची ऑफर मिळाली. तसेच 2006मध्ये त्यानं रोहित शेट्टीच्या 'गोलमाल: फन अनलिमिटेड' या चित्रपटातून त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अलीकडेच तो 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर दिसला होता. आज आम्ही तुम्हाला सिद्धार्थ जाधवच्या काही विशेष चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही पाहू शकता.
1 दे धक्का : सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे दिग्दर्शित 'दे धक्का' हा चित्रपट खूप कॉमेडी आणि भावनिक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 10 कोटींची कमाई केली होती. 'दे धक्का' चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वेनं कॅमियो केला होता. या चित्रपटात सायली, एक महत्त्वाकांक्षी डान्सर असून तिला मुंबईत एका प्रतिष्ठित नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. तिच्या कुटुंबाला तिनं इतका दूरचा प्रवास करणे, हे योग्य वाटत नाही, मात्र बक्षीस रक्कम मिळविण्यासाठी तिचे कुटुंब तिला पाठविण्यासाठी तयार होता. तिच्या या प्रवासात तिचे कुटुंब देखील तिच्याबरोबर जाते. या चित्रपटामध्ये या कुटुंबाचा रोमांचक प्रवास दाखविण्यात आला आहे. 'दे धक्का' चित्रपटाचा सीक्वेल देखील तयार करण्यात आला आहे. 'दे धक्का 2' हा चित्रपट 2022मध्ये प्रदर्शित झाला होता.
2 जत्रा: ह्यलागड रे त्यालागड :2006मध्ये प्रदर्शित झालेला 'जत्रा: ह्यलागड रे त्यालागड' हा एक विनोदी चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाला अजय आणि अतुल या जोडीनं संगीत दिलं आहे. या चित्रपटामधील 'कोंबडी पळाली' गाणं खूप जास्त लोकप्रिय झालं होतं. या चित्रपटामध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके आणि प्रिय बेर्डे यांनी धमाकेदार अभिनय केला आहे.