मुंबई : कधी सलमान खान तर कधी शाहरुख खान या दोन्ही अभिनेत्यांना जीवे मारण्यासाठी येणाऱ्या धमकीचं सत्र थांबता थांबत नाहीये. शाहरुख खान पाठोपाठ आता सलमान खानला (Threat Message For Salman Khan) पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून (Lawrence Bishnoi Gang) धमकीचा संदेश आला आहे. मुंबईच्या ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला गुरुवारी रात्री बारा वाजता हा संदेश प्राप्त झाला आहे.
पुन्हा गाणं लिहू शकणार नाही : अभिनेता सलमान खानला बिष्णोई गँगकडून पुन्हा एकदा धमकीचा संदेश प्राप्त झालाय. गुरुवारी रात्री बारा वाजता मुंबई ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला सलमान खानला धमकीचा एक संदेश प्राप्त झाला. सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यावर एक गाणं लिहिण्यात आलंय. मात्र, हे गाणं लिहिणाऱ्याला सोडलं जाणार नाही, अशी धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, "एका महिन्याच्या आत ज्यानं हे गाणं लिहिलंय त्याला ठार मारण्यात येईल. त्याची अवस्था इतकी वाईट केली जाईल की तो पुन्हा आपल्या नावानं गाणं लिहू शकणार नाही. जर सलमान खान मध्ये हिम्मत असेल तर त्यानं हे गाणं लिहिणाऱ्याला वाचवावं."