मुंबई- ANURAG KASHYAP ON ABHAY DEOL : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपनं अभय देओलबरोबर ताणलेल्या नातेसंबंधावर बोलतांना सांगितलं की सत्य उघड केलं तर ते त्याला खूप जड जाऊ शकेल. 2009 मध्ये 'देव डी' या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अनुराग आणि अभय यांच्यामध्ये मतभेद झाले आणि तेव्हा पासून ते वेगळे झाले आहेत. अलिकडे अभयनं दोघांच्यातील संबंधावर भाष्य केल्यानंतर अनुरागनं आक्रमकपणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अनुरागनं अभयबरोबरचे त्याचे समीकरण आणि अभिनेता पंकज झा यांच्याशी झालेल्या मतभेदाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अनुरागने स्पष्ट केले की, "मी नातेसंबंध जपण्याबाबत वाईट नाही. 'देव डी'च्या शूटिंगपासून अभयला, मी भेटलो नाही. तो प्रमोशनसाठीही आला नाही आणि तेव्हापासून तो माझ्याशी कधीही बोलला नाही. जर त्याला मला टॉक्सीक म्हणायचं असेल तर, ठीक आहे, ही त्याची बाजू आहे."
तो पुढे म्हणाला, "सत्य बोलता येत नाही, कारण मी खरे बोललो तर त्याला तोंड दाखवता येणार नाही. त्यात इतकं सत्य दडलंय की अभयला बोलण्याची हिंमतही होणार नाही. आणि मी याबद्दल बोलणार नाही कारण तसं केलं तर त्याची बदनामी होईल."
पंकज झा यांच्या जागी पंकज त्रिपाठीला 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये न सांगता घेण्याच्या आणखी एका वादाला तोंड देताना अनुरागने हा गैरसमज असल्याचं फेटाळून लावलं. त्यावेळी पंकज झा एका आश्रमात भरती झाले होते आणि त्यावेळी अभिनयापासून दूर होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
कास्टिंग बदलाबाबत स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, "त्या चित्रपटासाठी माझ्याकडं खूप कमी बजेट होतं आणि त्वरीत कोणीतरी शोधायचं होतं. पंकज त्रिपाठी शेवटच्या क्षणी टीममध्ये आले." अनुरागने सांगितलं की, ''पंकज झा यांनी त्यानंतर कधीही कामसाठी संपर्क साधला नाही, आणि याबद्दल त्यांना काय वाटतं हेही मला माहिती नाही.''