मुंबई - Ankita Lokhande Lashes out at Paps : अभिनेत्राी अंकिता लोखंडेची भूमिका असलेला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट आज देशभर रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मुंबईतील एका सिनेमागृहात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पापाराझींवर अंकिता नाराज झाल्याचे दिसले.
रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असलेला या चित्रपटात अंकिता महत्त्वाची भूमिका करत आहे. गुरुवारी संध्याकाळी सेलेब्रिटींसाठी चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यातील एका व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे तिचे 'बिग बॉस 17' स्पर्धक सहकारी अभिषेक कुमार आणि फिरोजा खान उर्फ खानजादीसह सिनेमा हॉलच्या दिशेने जात असताना नेहमीप्रमाणे पापाराझी त्यांच्या बरोबर मागे होते. यातील काहींना फोटो काढण्यासाठी त्यांच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वागण्याचा अंकिताला राग आला आणि त्यांना 'इथून जा', असे म्हणत त्यांना फटकारले. "तुम्ही लोक बाहेर निघून जा, प्लीज. हे खरंच बरोबर नाही. फिल्म चल रही है यार अंदर. क्या बात है ये," असं म्हणत अंकिताने पापाराझींना झापलं
या चित्रपटात अंकिता लोखंडेनं सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकरांची भूमिका साकारली आहे. तर रणदीपने विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा अंकिता आणि रणदीप यांचा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनय करण्या बरोबरच रणदीपने याचे दिग्दर्शनही केलंय आणि सह-लेखक आणि सह-निर्माताची भूमिकाही पार पाडली आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिला शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी केलेल्या अन्यायाची अतिशय थरारक कथा यात पाहायला मिळते. सावरकरांच्या जीवनाचा कष्टदायी प्रवास या बायोपिकमधून पाहायला मिळतो. हा चित्रपट सर्वांनी पाहायला हवा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.