मुंबई - आमिर खान निर्मिती करत असलेल्या फाळणीवर आधारित 'लाहोर 1947' हा पीरियड ड्रामा चित्रपट 2025मध्ये धमाका करणार आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर, मिस्टर परफेक्शनिस्टने काही बदल करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आता सनी देओल पुन्हा सेटवर परत येणार आहे.
'लाहोर 1947' चित्रपटाचे गेल्या काही दिवसापासून शूटिंग सुरू आहे. याचे सीन्स पाहिल्यानंतर आमिर खाननं यात काही बदल सूचवले. यामुळे चित्रपटाच्या कथानकामध्ये आणखी क्रिएटिव्ह भर पडणार आहे. असं समजतंय की, सनी देओलनं नुकतेच 'जाट' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे आणि आता तो आणखी काही दृश्ये शूट करण्यासाठी राजकुमार संतोषी दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर परत जात आहे. आमिर खाननम दिलेल्या बदलांवर काम करण्यासाठी सनी देओलनं त्याचे वेळापत्रक बदलण्यास लगेच होकार दिला आहे.
'या' नव्या बदलांसाठी सनी देओल परतणार आहे
'लाहोर 1947' चा पहिला कट पाहिल्यानंतर आमिरला वाटलं की काही दृश्ये अधिक नाट्यमय केल्यास चित्रपटाच्या कथेला फायदा होऊ शकतो. त्यानं संतोषीबरोबर त्याच्या या सूचना शेअर केल्या आणि त्यानंही होकार दिला, त्यानंतर सनी देओलही लवकरच सेटवर परतणार आहे. चित्रपटाची तंत्रज्ञ टीम 10-15 दिवसांचे अधिक शूटिंग करण्याच्या विचारात आहे. बदलेल्या दृश्यांव्यतिरिक्त, भव्यता दाखवण्यासाठी कथेमध्ये एक गाणं देखील समाविष्ट केलं जात आहे. यासाठी मेहबूब स्टुडिओमध्ये सेट तयार करण्यात आला असून, 1 डिसेंबरपासून शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.
'लाहोर 1947' चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
'लाहोर 1947' हा असगर वजाहत यांच्या जिस लाहौर नई देख्या, ओ जम्याई नी या गाजलेल्या नाटकावर आधारित आहे. वृत्तानुसार, कथा एका मुस्लिम कुटुंबाभोवती फिरते जे लखनौहून लाहोरला जातात. तिथे त्यांना एका मृत हिंदू कुटुंबानं सोडलेला एक वाडा राहण्यासाठी मिळतो. या घरात त्यांना एक हिंदू महिला असते जी घर सोडायला तयार असत नाही, त्यामुळे कथानकाला एक नवं वळण मिळतं. माहितीनुसार शबाना आझमी एका हिंदू महिलेच्या भूमिकेत आणि अभिमन्यू सिंग हा खलनायकाच्या भूमिकेत यात दिसणार आहे. अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली तरी निर्माते हा चित्रपट प्रजासत्ताक दिन 2025 ला प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.