मुंबई - Aamir Khan and Darsheel Safary reunite : 'तारे जमीन पर' हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. डिसलेक्सिया या दृष्टीदोषामुळे मुलांची होणारी घुसमट या चित्रपटात आपण पाहिली होती. कित्येक प्रेक्षकांनी अतिशय पाणावलेल्या डोळ्यांनी त्यातील इशान या मुलांची गोष्ट अनुभवली होती. विशेष म्हणजे अमोल गुप्तच्या साथीनं आमिर खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 16 वर्षापूर्वी आलेल्या या चित्रपटात छोट्या इशानची भूमिका दर्शील सफारी या बालकलाकारानं साकारली होती. आता 'तारे जमीन पर' मध्ये सहकलाकार असलेले अभिनेता आमिर खान आणि दर्शील सफारी 16 वर्षांनंतर एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत.
सोमवारी दर्शील सफारीने त्याच्या इंस्टाग्रामवर आमिर खान बरोबरचा त्याचा फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. कोलाजमध्ये त्याने 'तेव्हा आणि आता' असे दोन फोटो शेअर केलेत. यातील एक फोटो आहे तारे जमीनपरमधील तर दुसऱ्या फोटो दर्शील आमिर खानच्या बरोबर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. या रहस्यावरील पडदा चार दिवसांनी उघडणार असल्याचे संकेतही त्यानं दिले आहेत.
त्याने लिहिलंय, "BOOOMMMMM. 16 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. भावनिक? होय, थोडासा झालो आहे. पुन्हा चार्ज झालोय का असे विचारत असाल तप अगदी बरोबर आहे. माझ्ये मार्गददर्शकाला या अनुभव देण्यासाठी खूप सारे प्रेम. याच जागेवर एका मोठ्या गोष्टीची घोेषणा केली जाणारा आहे ती पाहा. फक्त 4 दिवस उरले आहेत."
'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या 'सीतारे जमीन पर' चित्रपटात दर्शील पुन्हा एकदा झळकणार असल्याचे संकेत या पोस्टमधून मिळत आहेत. काही चाहत्यांनी असे गृहीत धरले होते की दोघांनी एका जाहिरातीसाठी सहकार्य केले असावे. दर्शीलने शेअर केलेल्या अपडेटची प्रतीक्षा केली जात आहे.