मुंबई - Aamir Khan breakfast with media : आमिर खाननं १४ मार्चला त्याचा 59 वा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा केला. आमिर खान त्याच्या वाढदिवशी सुद्धा शूट करीत असल्यामुळे त्याने मीडियाला ब्रेकफास्ट साठी निमंत्रित केले आणि केक कापल्यावर सर्वांशी गप्पा मारल्या. आमिर खान नेहमीच हटके गोष्टी करीत आला आहे. गेली काही वर्षे तो न चुकता मीडियाकर्मींसोबत आपला वाढदिवस साजरा करीत आला आहे. कालही आमिर खानने मीडियातील सहकाऱ्यांसह आपला वाढदिवस साजरा केला. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सुद्धा यावेळी उपस्थित होती. तिने दिग्दर्शित केलेला आणि आमिर खान प्रॉडक्शन्स ने निर्मिती केलेला लापता लेडीज हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांना आवडला असून त्याचे अजूनही चित्रपटगृहात खेळ सुरु आहेत. 'लापता लेडीज'मधील कलाकार, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रांटा, हे देखील यावेळी उपस्थित होते. त्याच्या निर्मितीसंस्थेने निर्मिती केलेल्या 'लापता लेडीज'मध्ये नवकलाकारांना संधी देण्यात आली ज्याचे त्यांनी सोने केले. म्हणूनच आमिर यापुढेही नवोदित कलाकारांना संधी देण्यास प्राधान्य देणार आहे.
आमिर खानने प्रोड्युस केलेल्या लापता लेडीज ला सिनेइंडस्ट्रीमधून सुद्धा प्रेम मिळत आहे. शबाना आझमी, जिनिलिया देशमुख यांना हा चित्रपट खूप आवडला तसेच भारत रत्न आणि आमिर खान जवळचा मित्र सचिन तेंडुलकरने सुद्धा यांना चित्रपटाची स्तुती केली आहे. कालच सलमान खान ने सोशल मीडियावर लिहिले की, "नुकताच किरण रावचा लापता लेडीज पाहिला. वाह वाह किरण. मला खूप आनंद झाला आणि माझ्या वडिलांनाही. दिग्दर्शक म्हणून तुझे अभिनंदन, उत्तम काम. कब काम करोगी मेरे साथ?" अजून एक गोष्ट की आमिर खान नेहमी एक गोड तक्रार करीत असतो की किरण त्याला तिच्या चित्रपटात काम देत नाही. 'धोबी घाट' मध्ये देखील ऑडिशन देऊनही आमिरला किरण राव ने चित्रपटात काम दिले नव्हते आणि 'लापता लेडीज'मध्ये सुद्धा घेतले नाही. तिच्यामते चित्रपटातील कॅरेक्टर्स मध्ये आमिरच्या स्टारडम ची छाप पडलेली तिला नको होती.