मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात ३०८(४), ३५१(३)(४) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.
सिनेस्टार शाहरुख खानला धमकीचा कॉल आला होता याची खात्री मुंबई पोलीसांनी केली आहे. या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या पथकाने रायपूर, छत्तीसगड येथील कॉल ट्रेस केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक छत्तीसगडला रवाना झाले असून तपास सुरू झाला आहे.
अलीकडे सलमान खानला सतत धमकी देण्याचं सत्र सुरू आहे. यापूर्वी त्याच्या घरावर गोळीबार करण्याचा प्रकारही घडला होता. त्यानंतर मुंबईत बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी जवळचा संबंध असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रसंगात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. सलमान आणि शाहरुख यांच्यातील दूरावा कमी करण्यात बाबा सिद्दीकी यांचा मोठा वाटा होता. यापार्श्वभूमीवर आता सलमानच्या पाठोपाठ शाहरुखला आलेली जीवे मारण्याची धमकी गंभीर स्वरुपाची आहे.
शाहरुख खान नेहमी स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेत वावरत असतो. त्याला धमकी मिळाल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. या तक्रारीमध्ये तो अज्ञात व्यक्ती कोण आहे, धमकी देण्यामागे कोणाचा हात आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे.
यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनेता सलमान खान विरोधात धमकीचा संदेश मिळाला होता, असे पोलिसांनी सांगितले. या धमकीच्या मेसेजमध्ये सलमाननं माफी मागावी किंवा जिवंत राहण्यासाठी 5 कोटी रुपये द्यावेत असे दोन पर्याय देण्यात आले होते.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आला होता. त्यात सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर असा संदेश देण्यात आला आहे.
"त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत. जर त्याने तसे केले नाही तर आम्ही त्याला मारून टाकू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे," असा दावा लॉरेन्स बिश्नोईच्या भावाच्या नावाने करणाऱ्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
हा मेसेज सोमवारी आला असून त्यांनी तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका आठवड्यात सलमान खानला मिळालेली ही दुसरी जीवे मारण्याची धमकी आहे. यापूर्वी मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यामध्ये सलमनकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी जमशेदपूर येथून एका व्यक्तीला अटक केली होती ज्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश मिळाल्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला होता.