मुंबई-राज्यातील निवडणूक निकालांनी उत्साही असलेल्या देशांतर्गत शेअर बाजारात आज (सोमवार) तेजीचा कल पाहायला मिळालाय. 25 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात तुफान वाढ झालीय. सेन्सेक्स 992 अंकांनी उसळी घेत 80,109 वर बंद झाला आणि निफ्टी 314 अंकांनी उसळी घेत 24,221 वर बंद झालाय.आज शेअर बाजारात बँकिंग, मीडिया आणि पीएसयू बँक क्षेत्रात सर्वाधिक खरेदी दिसून आली. सर्वच क्षेत्रातील समभाग हिरव्या चिन्हावर बंद झालेत. ओएनजीसी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्सचे समभागही 4 ते 5 टक्क्यानं वाढलेत. तर जेएसडब्ल्यू स्टील आणि टेक महिंद्राच्या समभागांना सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलंय.
शेअर बाजारातील मोठ्या समभागांमध्ये उसळी : व्यापार सत्राच्या पहिल्या तासानंतर शेअर बाजारातील मोठ्या समभागांपैकी भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग 5.04 टक्के ते 3.95 टक्क्यांच्या मजबूतीसह व्यवहार करीत होते. दुसरीकडे JSW स्टील आणि इन्फोसिसचे शेअर्स 2.29 टक्क्यांनी घसरले.
30 समभागांपैकी 28 समभाग खरेदीला पाठिंबा :सध्याच्या चालू व्यापार सत्रात शेअर बाजारात 2,406 समभागांमध्ये सक्रिय ट्रेडिंग सुरू आहे. यापैकी 2,037 शेअर्सने नफा कमावल्यामुळे ते हिरव्या रंगात व्यापार करीत होते, तर 369 शेअर्सना तोटा सहन करावा लागला असून, ते लाल रंगात व्यापार करीत होते. तसेच सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 समभागांपैकी 28 समभाग खरेदीला पाठिंबा देत हिरव्या रंगात असल्याचं पाहायला मिळाले होते. तर विक्रीच्या दबावामुळे 2 समभाग लाल चिन्हामध्ये व्यापार करीत होते. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या 50 समभागांपैकी 48 समभाग हिरव्या चिन्हात आणि 2 समभाग लाल चिन्हात व्यापार करताना दिसले. खरं तर शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स आज 1,076.36 अंकांच्या वाढीसह 80,193.47 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यानंतर नफा बुकिंगच्या दबावाखाली सेन्सेक्स 80,056.35 अंकांपर्यंत घसरला, पण त्यानंतर खरेदीचा दबाव वाढला, तेव्हा तो 80,452.94 अंकांपर्यंत पोहोचण्यातही यशस्वी झालाय. बाजारात सतत खरेदी-विक्री सुरू असताना पहिल्या व्यापार सत्रात सकाळी 10:15 वाजता सेन्सेक्स 1,112.12 अंकांच्या वाढीसह 80,229.23 अंकांवर व्यवहार करीत होता.
बाजार उघडताच नफा वसुली सुरू :सेन्सेक्सप्रमाणेच NSEच्या निफ्टीनेही आज 346.30 अंकांची उसळी घेतली आणि तोसुद्धा 24,253.55 अंकांवर व्यापार करीत होता. बाजार उघडताच नफा बुकिंग सुरू झाल्याने सेन्सेक्स 24,212.25 अंकांवर घसरला. या घसरणीनंतर खरेदीदारांनी पुन्हा दबाव आणला, ज्यामुळे हा निर्देशांक 24,330.70 अंकांवर पोहोचण्यात यशस्वी ठरला. बाजारातील सतत खरेदी-विक्रीदरम्यान सुरुवातीच्या 1 तासाच्या व्यापार सत्रानंतर सकाळी 10:15 वाजताच्या दरम्यान निफ्टी 363.50 अंकांच्या वाढीसह 24,270.75 अंकांच्या पातळीवर व्यापार करीत होता. याआधी शुक्रवारी गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यापार सत्राच्या दिवशी सेन्सेक्स 1,961.32 अंकांच्या म्हणजेच 2.54 टक्क्यांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला होता. तसेच निफ्टीसुद्धा शुक्रवारच्या व्यापार सत्रात 557.35 अंकांच्या म्हणजेच 2.39 टक्क्यांच्या वाढीसह 23,907.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.
भारत-अमेरिका संबंध आणखी सुधारणार :विशेष म्हणजे शेअर बाजाराच्या चढउतारावर आता शेअर बाजार अभ्यासक आणि सीए निखिलेश सोमण यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलीय. गेल्या महिन्याभरात बाजार खाली येत होता. 26300 निफ्टीचा निर्देशांकही 23200 पर्यंत तो खाली आला होता. त्यात जवळपास 3 हजारांहून अधिकची घसरण झाली होती. त्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री सुरूच ठेवली. जवळपास सव्वालाख कोटींच्या वर त्यांनी समभाग विकले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा विक्रीचा मारा थोडा कमी झालाय. तसेच ते आता खरेदीलाही सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. महायुतीचं स्थिर सरकार आल्यामुळे शेअर बाजाराला चालना मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं डबल इंजिन सरकार आल्यानं 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था लक्ष गाठण्याच्या दृष्टीने सरकार अधिक जोमाने कामाला लागेल. जानेवारीत ट्रम्प सत्तेवर परत आल्यानंतर काय होते हे बघणं आवश्यक आहे. भारत-अमेरिका सबंध आणखी सुधारतील आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी उपयोगी पडतील. परदेशी गुंतवणूकदारांसाठी वर्षाच्या शेवटचा महिना नफावसुलीचा असतो. येत्या काळात शेअर बाजार स्थिरावेल. तसेच रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांसारख्या युद्धाच्या बातम्या आल्या नाहीत तर शेअर बाजार नक्कीच स्थिरावले असंही शेअर बाजार अभ्यासक आणि सीए निखिलेश सोमण यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा-
- महाराष्ट्रातील 7 लाख कोटी किमतीचे प्रकल्प राज्याबाहेर गेले-राहुल गांधी
- गौतम अदानींसोबत शरद पवारांची बैठक ही वस्तुस्थिती; मंत्री हसन मुश्रीफांनी केली अजित पवारांची पाठराखण