मुंबईRatan Tata funeral :ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर वरळी, मुंबई येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा हे पारशी समाजाचे होते, पण तरीही त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. मात्र, पारशी लोकांच्या चालीरीती आणि परंपरा पूर्णपणे वेगळ्या आहेत. पारशी समाजातील अंत्यसंस्काराच्या प्रथा हिंदू आणि मुस्लिमांपेक्षा वेगळ्या आहेत.
पारशी कसा करतात अंत्यसंस्कार? : पारशी लोक हिंदूं प्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार करत नाहीत. तसंच त्यांच्या मुस्लिमांसारखी दफन करण्याचीसुद्धा पद्धत नाहीय. त्यांची अंत्यसंस्कार करण्याची पद्धत इतर समाजापेक्षा वेगळी आहे. खरे तर मानवी शरीर ही निसर्गानं दिलेली देणगी आहे, जी मृत्यूनंतर देवाला परत करावी लागते, अशी या समाजाची धारणा आहे. जगभरातील पारशी समुदाय त्याच भावनेनं मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या अंत्यसंस्कार पद्धतीला टॉवर ऑफ सायलेन्स म्हणतात.