बंगळुरू Hidden Camera In Washroom :बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडलीय. बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी शॉपच्या महिलांच्या टॉयलेटमध्ये रेकॉर्डिंग सुरू ठेवून मोबाईल फोन डस्टबिनमध्ये ठेवण्यात आल्याचं उघड झालंय. तसंच फोनचा आवाज येऊन नये म्हणून हा फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यात आला होता. ही बाब एका महिलेच्या लक्षात आल्यानंतर सदरील प्रकरण उघडकीस आलं. तसंच महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिने फोन बघितला. तेव्हा त्यात दोन तासांपासून रेकॉर्डिंग सुरू होतं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कॅफेत काम करणाऱ्या एकाला अटक केलीय.
नेमकं काय आहे प्रकरण? : एका इन्स्टाग्राम युझरनं या घटनेची माहिती देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर या घटनेवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसंच पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली. युझरनं आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, “एका महिलेला टॉयलेटमधील डस्टबिनमध्ये लपवलेला एक फोन सापडला. यामध्ये टॉयलेट सीटकडं तोंड करून सुमारे 2 तास व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होते. हा फोन फ्लाइट मोडवर होता. जेणेकरून त्याचा आवाज येणार नाही. तसंच डस्टबिन बॅगमध्ये एक छिद्र करुन केवळ कॅमेराच दिसेल, अशा पद्धतीनं तो फोन ठेवण्यात आला होता." ही बाब लक्षात येताच महिलेनं आरडाओरडा केला. त्यानंतर तिथं पोलिसांना बोलावण्यात आलं. चौकशीदरम्यान हा फोन कॅफेत काम करणाऱ्याचा असल्याचं समोर आलं. सध्या त्याच्यावर सुरू आहे."