हैदराबाद Independence Day 2024: स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे, जो दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. यंदा संपूर्ण देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी 'राष्ट्रध्वज' (Indian Flag) फडकवणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपला ध्वज हे राष्ट्राभिमानाचं प्रतिक आहे. स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येतो. देशाचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' म्हणून ओळखला जातो, जो भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा असतो. यात पांढर्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत.
लाल किल्ल्यावर ध्वजारोहन : यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्याच्या तटबंदीवरुन तिरंगा फडकवून देशाला संबोधित करतील.
कोणत्या थीमवर साजरा होणार स्वातंत्र्य दिन : यावर्षी 'विकसित भारत' या थीमवर स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day Theme) सण साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनवणं हे देशाचं ध्येय आहे.
ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात फरक काय - 'ध्वज फडकवणं' आणि 'ध्वजारोहण' यात खूप फरक आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. वास्तविक, 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज खांबावर शीर्षस्थानी बांधला जातो आणि तेथून 'ध्वज फडकवला' जातो, याला ध्वज फडकवणं म्हणतात. तर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज खालून दोरीने वर खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो, याला 'ध्वजारोहण' म्हणतात. कारण जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश सरकारचा ध्वज उतरवून भारताचा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळं 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो.
पंतप्रधान करतात ध्वजारोहण :स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 ऑगस्ट), पंतप्रधान कार्यक्रमात सहभागी होतात आणि ध्वजारोहण करतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात. त्यानंतर ध्वज फडकवतात.