नवी दिल्ली :वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी बैठक होणार होती. परंतु, बैठकीच्या पहिल्याच दिवशी खासदारांमध्ये राडा झाला. यामुळे विरोधी पक्षातील 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या खासदारांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश आहे. बैठकीत गदारोळ झाल्यामुळे ही बैठक 27 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
चर्चेत नेमकं काय घडल? :भाजपा खासदार जगदंबिका पाल हे वक्फ विधेयकाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, आम्ही आज (दि.24) मीरवाईज उमर फारूक यांच्या शिष्टमंडळाला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, संसदेत विधेयकाच्या चर्चेत सहभागी न होणारे असदुद्दीन ओवेसी आज चर्चेत सहभागी झाले. तसंच तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माझ्याशी बोलताना असंसदीय भाषा वापरली. मी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला. निलंबित सदस्यांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नसीर हुसेन, मोहिबुल्ला, मोहम्मद अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीम-उल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.