लखनऊ Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी वाराणसीतून तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. मात्र अर्ज छाननीनंतर 8 उमेदवारचं रिंगणात आहेत. अर्जात तृटी असल्यानं निवडणूक आयोगानं तब्बल 33 उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय, बहुजन समाज पक्षाचे अथर जमाल लारी आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कॉमेडियन श्याम रंगीलाचा नामांकन अर्ज बाद :वाराणसीचे जिल्हाधिकारी एसराज लिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नामनिर्देशनपत्र योग्य आढळणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र काही उमेदवारांच्या नामांकन पत्रात त्रृटी आढळून आल्यानं त्यांचा नामांकन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान गाजवणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगीला याचाही नामांकन अर्ज बाद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एसराज लिंगम यांनी दिली. कॉमेडियन श्याम रंगीला याच्या पोस्टला उत्तर देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्यानं आणि तुम्ही शपथ घेत नसल्यामुळे तुमचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. याबाबत ऑर्डरची एक प्रत तुम्हाला देण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे.