उत्तर प्रदेशमध्ये अपघात (Source- ETV Bharat Reporter) शाहजहापूर (लखनौ) : उत्तर प्रदेशमध्ये भाविकांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. खासगी बसवर खडी वाहून नेणारा ट्रक पलटी झाल्यानं 11 भाविकांचा मृत्यू झाला. तर अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सीतापूरहून पूर्णागिरीला जाणाऱ्या भाविकांच्या खासगी बसचा शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. हा अपघात खुटार भागातील गोला बायपास रोडवरील एका ढाब्याजवळ घडला. खडी वाहून नेणाऱ्या ट्रकनं बसला धडक दिली. त्यानंतर ट्रक ही बसवर पलटली. त्यानंतर प्रवाशांनी एकच आक्रोश केला. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. सुमारे ३ तासांच बचावकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
जेवणासाठी बस थांबविली अन् घात झाला..सीतापूर जिल्ह्यातील सिधौली परिसरातील बाराजेठा गावात राहणारे लोक शनिवारी रात्री माँ पूर्णागिरीच्या दर्शनासाठी खासगी बसमधून जात होते. शाहजहानपूरच्या खुटार भागात गोला बायपास रोडवरील एका ढाब्यावर बस जेवणासाठी थांबविण्यात आली. काही यात्रेकरू बसमधून उतरून जेवणासाठी ढाब्यावर पोहोचले होते. तर काही यात्रेकरू बस निघण्याची वाट पाहत बसमध्ये थांबले होते.
नेमका कसा घडला अपघात?-रात्री 11.20 च्या सुमारास खडी वाहू नेणाऱ्या ट्रकनं बसला जोरदार धडक दिली. अपघातामधून सावरण्यापूर्वीच ट्रक यात्रेकरूंच्या बसवर पलटी झाला. यात्रेकरू खडीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघातानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांतानं आरडाओरडा झाला. अपघाताची माहिती मिळताच काही वेळात पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी उमेश प्रताप सिंह आणि एसपी अशोक कुमार मीना हे देखील रात्री 12.50 च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले.
ढिगाऱ्याखाली दबून 11 भाविकांचा मृत्यू-यात्रेकरूंना बसमधून सुरक्षित काढण्याकरिता क्रेन आणि बुलडोझरही मागवण्यात आला. सुमारे 3 तास चाललेल्या बचावकार्यानंतर सर्वांना बाहेर काढता आले. तोपर्यंत ढिगाऱ्याखाली दबून 11 भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 जणांना रुग्णवाहिकेतून जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं. जिल्हाधिकारी उमेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, " अपघातस्थळी बचावकार्य करण्यात आलं. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात कसा घडला, याबाबतची माहिती घेतली जात आहे. अद्याप काही मृतदेहांचीही ओळख पटलेली नाही. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे."
हेही वाचा-
- रस्त्यात नव्हे आता थेट रुग्णालय आवारात 'हिट अँड रन', वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी सायन हॉस्पिटलच्या डीनला अटक - Mumbai Sion Accident
- पुणे हिट अँड रन प्रकरण, अल्पवयीन मुलाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Car Accident Case Pune