महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार - अमित शाह

Citizenship Amendment Act : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय. ते दिल्लीतील ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायदा डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला होता.

Citizenship Amendment Act
Citizenship Amendment Act

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 4:51 PM IST

नवी दिल्लीCitizenship Amendment Act :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभर लागू केला जाईल, अशी मोठी घोषणा केलीय. संसदेनं डिसेंबर 2019 मध्ये या कायद्याला मंजुरी दिली होती. “नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाईल. हा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केला जाईल", अशी घोषणा अमित शाह यांनी दिल्लीतील ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये केलीय.

नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही :यावेळी बोलताना त्यांनी काॅंग्रेसवर देखील टीका केलीय. “नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचं काँग्रेसनं वचन दिलं होतं. देशाची फाळणी झाली तेव्हा, देशातील अल्पसंख्यकांवर अत्याचार झाले. त्यानंतर काँग्रेसनं निर्वासितांचं भारतात स्वागत केलं. त्यावेळी काॅंग्रेसनं त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचं वचन दिलं होतं. मात्र, आता काँग्रेस याला नाकरत आहे", अशी टीकाही अमित शाह यांनी यावेळी केली. तसंच, "हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही" असंही त्यांनी स्पष्ट केलं.

CAA बद्दल लोकांना भडकवलं जातंय : “आपल्या देशातील अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समुदायातील लोकांना भडकवलं जात आहे. त्यांचं नागरिकत्व भाजपा सरकार काढून घेण्याची त्यांना विरोधक भीती दाखवत आहेत. पण, CAA मुळं कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. कारण त्या संदर्भात तशी तरतूदच केलेली नाही. CAA हा बांगलादेश, पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे,” असं शाह म्हणाले.

गैर-मुस्लिम स्थलांतरितांना देणार नागरिकत्व : "31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याचं या कायद्याचं उद्दिष्ट आहे", असं शाह यांनी म्हटलंय. हा डिसेंबर 2019 मध्ये संसदेनं CAA कायदा मंजूर केला होता. त्यानंतर देशभरातून या कायद्याविरोधात निषेध नोंदवण्यात आला होता. हा कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं.

केंद्रीय मंत्र्यांचे सूचक विधान :केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, पुढील आठवड्यात CAA कायदा देशभरात लागू करण्यात येईल. पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातील काकद्वीप भागात आयोजित एका कार्यक्रमात शंतनू ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपली भूमिका मांडली होती. आज 'मी' तुम्हाला खात्री देतो की, नागरिकत्व सुधारणा कायदा केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात लागू केला जाईल. हा कायदा देशातील प्रत्येक राज्यात लागू केला जाईल, असं शंतनू ठाकूर यांनी या कार्यक्रमात सांगितलं. त्यानंतर अमित शाह यांनी आज नागरिकत्व कायदा देशभरात लागू करणार असल्याचं म्हटलं आहे.

भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार :आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 370 जागा मिळतील, असा विश्वास देखील अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. तसंच देशात एनडीएच्या 400 हून अधिक जागा निवडून येतील, असा दावा अमित शाह यांनी केला. भाजपा केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलंय.

'हे' वाचलंत का :

  1. 17 दिवसांत 5 जणांचा सन्मान, आता 'भारतरत्न'चंही राजकीयकरण होतंय का?
  2. एकाचवेळी तिघांना भारतरत्न; नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान
  3. लोकसभा निवडणुकीची तयारी, यूपीए सरकारविरोधातील 'श्वेतपत्रिका' भाजपा प्रत्येक राज्यात घेऊन जाणार

ABOUT THE AUTHOR

...view details