नवी दिल्ली :देशाच्या राजधानीत दिवाळीचा जल्लोष सुरू असताना मारेकऱ्यांनी काका आणि पुतण्यावर गोळीबार करुन त्यांना ठार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना फरास बाजार पोलीस ठाण्यातील परिसरात गुरुवारी रात्री घडली. या गोळीबारात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळीबार केला असून यात आकाश शर्मा आणि ऋषभ शर्मा या काका पुतण्यांचा मृत्यू झाला. तर 10 वर्षाचा क्रिश शर्मा गंभीर जखमी झाला. राजधानीत फटाक्यांच्या आवाजामुळे गोळीबार केल्याचा आवाज नागरिकांना जाणवला नाही, मात्र घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
काका पुतण्यांचा गोळीबारात मृत्यू :गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास फरास बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरातील बिहारी कॉलनीत गोळीबार झाल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत आकाश शर्मा ( वय 40 वर्ष ) आणि त्याचा पुतण्या ऋषभ शर्मा ( वय 16 वर्ष ) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर आकाशचा मुलगा क्रिश शर्मा याला एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे, अशी माहिती शाहदराचे पोलीस उपायुक्त प्रशांत गौतम यांनी दिली.
हल्लेखोरांनी झाडल्या पाच गोळ्या :दिल्लीतील बिहारी कॉलनीत काका आणि पुतण्याची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. यावेळी मारेकऱ्यांनी एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत गौतम यांनी दिली. "आकाश शर्मा आपला मुलगा क्रिश शर्मा आणि पुतण्या ऋषभ शर्मासोबत घराबाहेर दिवाळी साजरी करत होते. यावेळी तरुणानं तिथंथे येऊन एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. या गोलीबारात आकाश, ऋषभ आणि क्रिश जखमी झाले. शेजारील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी आकाश आणि ऋषभ यांना मृत घोषित केलं. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस लवकरचं आरोपीला अटक करुन या हत्या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढतील," असंही पोलीस उपायुक्त प्रशांत गौतम यांनी यावेळी सांगितलं.
मारेकऱ्यानं अगोदर केला चरणस्पर्श मग घातल्या गोळ्या :फरास बाजार परिसरात हल्लेखोरांनी काका पुतण्याची हत्या केल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसला. याबाबत बोलताना पीडित कुटुंबानं सांगितलं, की "बंटी नावाच्या माथेफिरुन ही घटना घडवून आणली. संशयित बंटी नावाचा तरुण तिथं आला, त्यानं अगोदर पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यानं गोळीबार केला. बंटीच्या कुटुंबीयांशी पीडित कुटुंबीयांचा वाद होता." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे पूर्ववैमनस्यातून घडलेलं हत्याकांड असल्याचं दिसत आहे. पीडिता कुटुंबीयांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- प्रेमसंबंधास दिला नकार; तरुणानं केली तरुणीची हत्या
- बॉलिवूडच्या भाईजानची पाचावर धारण; बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानची उडाली झोप, झिशान सिद्दिकींनी दिली 'ही' माहिती
- जमिनीच्या वादातून बांधकाम विकासकाची भररस्त्यात निर्घृण हत्या करणारे दोन आरोपी गजाआड