नवी दिल्ली- आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराकडून देण्यात येणाऱ्या लाडूत जनावराच्या चरबीचा वापर होत असल्याच्या टीडीपीच्या आरोपाला आता राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डनं (NDDB) पुष्टी दिली आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डनं लाडूची प्रयोगशाळेत तपासणी केली असता तिरुपती देवस्थानला पुरविण्यात येणाऱ्या तुपात गायीसह जनावराची चरबी आणि माशाचे तेल आढळले आहे.
वायआसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूत प्रचंड भेसळ झाल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केला. हे आरोप वायएसआर काँग्रेस पक्षानं फेटाळले आहेत. मात्र, तिरुपती लाडूमधील कथित भेसळीवरून आंध्र प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे.
- "जर आरोप हे राजकीय नसतील तर उच्चस्तरीय समिती नेमावी," असे आवाहन आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी केले. तसेच सीबीआय चौकशी करावी, असे वायएस शर्मिला यांनी चंद्राबाबू यांना म्हटलं आहे. शर्मिला या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिण आहेत.
केवळ ३२० रुपये किलो दरानं तूप खरेदी-वायएसआर पक्षानं आरोप फेटाळले असले तरी तेलुगु देसम पक्षाकडून (TDP) तुपातील भेसळीचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. टीडीपीचे अधिकृत प्रवक्ते अनाम व्यंकट रमणा रेड्डी यांनी नेल्लोर जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना एनडीडीबी प्रयोगशाळेचे अहवाल दाखविले. प्रसादाच्या लाडूत वापरण्यात येणाऱ्या तेलात ऑलिव्ह तेल, मक्याचे तेल, कापसाच्या बियांचे तेल, माशांचे तेल, गायीच्या चरबीचे तेल, पाम ऑईल आणि डुकराच्या चरबीचे घटक आढळल्याचा त्यांनी दावा केला. टीडीपीचे अधिकृत प्रवक्ते म्हणाले, "उत्कृष्ट दर्जाचे तूप हे प्रति किलो १ हजार रुपयांना मिळते. मात्र, केवळ ३२० रुपये किलो दरानं तूप खरेदी करण्यात आले. एवढ्या कमी किमतीचे तूप हे केवळ निकृष्ट दर्जाचे असू शकते." १५ हजार तुपाच्या खरेदीत लाचखोरी झाल्याचा संशयदेखील रेड्डी यांनी व्यक्त केला.