नवी दिल्ली : भाजपानं काही दिवसांपूर्वी चंदीगड महापौर निवडणुकीत बहुमत नसतानाही विजय खेचून आणला होता. निवडणूक अधिकारी हाताशी धरून विरोधातील इंडिया आघाडीचे आठ मत बाद करून हा विजय मिळवला होता. अशा पद्धतीने लोकशाहीचे लक्तर वेशीवर टांगले जात असतील तर लोकशाही कशी जिवंत राहील, असा परखड सवाल त्यावेळी आपकडून उपस्थित करण्यात आला होता. तसंच, इंडिया आघाडीनं या निकालाविरोधात न्यायलयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं झालेल्या प्रकाराबद्दल ''ही लोकशाहीची हत्या आहे'' अशी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं होत. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं जुना निकाल रद्द करत, आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित केलं.
कॅमेरॅकडे का पाहिल : सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध घोषित केलेली सर्व 8 मतं वैध ठरवण्याच्या सूचना दिल्या. या सर्व मतांच्या बॅलेट पेपरवर रिटर्निंग ऑफिसरनं क्रॉस केला होता. दुसरीकडे, रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांना हेराफेरीप्रकरणी दोषी ठरवत सर्वोच्च न्यायालयानं अवमानाची नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना विचारलं की, "तुम्ही कॅमेराकडे का पाहत होता? यावर मसिह म्हणाले की, सभागृहात गोंधळ सुरू होता. नगरसेवक कॅमेरा-कॅमेरा ओरडत होते. ते असं का करत आहेत, हे मी पाहत होतो."