रांची : बस्तर विभागातील कोंटा येथील भेज्जी भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. ओडिशामार्गे नक्षलवादी छत्तीसगडमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोंटा येथील भेज्जी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांना पकडण्याकरिता पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले, "सुकमा जिल्ह्यातील कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीचे नक्षलवादी सदस्य आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून आम्ही डीआरजीची टीम शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आली. आज सकाळी भेज्जीच्या जंगलात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली." भेज्जी भागातील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भंडारपदर या गावातील जंगल-टेकड्यांमध्ये डीआरजी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी सांगितलं. चकमकीत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या कारवाईत आयएनएसएएस( INSAS), एके- 47, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलता ठेवणाऱ्या धोरणावर कार्य करत आहे. बस्तरमध्ये विकास, शांतता आणि नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे". बस्तरमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे युग परत आल्याचाही मुख्यमंत्र्यांनी दावा केला.