चंदीगड :शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी उपमुख्यमंत्री असताना 2007 ते 2017 या कालावधीत धार्मिक गैरवर्तन केल्याचा ठपका अकाल तख्तकडून ठेवण्यात आला आहे. धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना स्वच्छता गृह साफ करण्याची आणि भांडी धुण्याची शिक्षा देण्यात आली आहे. सुखबीर सिंह बादल यांना ऑगस्टमध्ये धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी अकाल तख्तनं दोषी घोषित केलं.
धार्मिक गैरवर्तन केल्याप्रकरणी सुखबीर सिंह बादल दोषी :सुखबीर सिंह बादल यांनी 2007 ते 2017 या कालावधीत धार्मिक गैरवर्तन केल्याचा ठपका अकाल तख्तनं ठेवला आहे. अकाल तख्चे जथेदार ग्यानी रघबीर सिंग यांच्या अध्यक्षतेखालील पाच मुख्य पुजाऱ्यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. या पुजाऱ्यांनी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर सिंह बादल यांचा पक्षप्रमुखपदाचा राजीनामा स्वीकारण्यास सांगितलं. अकाल तख्त इथल्या शीख धर्मगुरूंनी 'तनखाह' अर्थात धार्मिक शिक्षा ठोठावताना सांगितलं, की सुखबीर सिंह बादल 3 डिसेंबरला दुपारी 12 ते 1 या वेळेत स्नानगृहं स्वच्छ करतील. त्यांना 12 ते 1 या वेळेत श्री दरबार साहिबच्या स्नानगृहांची सेवा करण्यास सांगण्यात आलं आहे. आज दुपारी आणि नंतर एक तास भांडी धुऊन गुरबानी ऐकावी लागणार आहे. त्यांना गळ्यात फलक घालण्यास सांगण्यात आलं आहे.