महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील तीर्थस्थळांवर आजपर्यंत 'या' ठिकाणी झाल्यात चेंगराचेंगरी, काय आहेत दुर्घटनेची कारणे? - STAMPEDE DEATH NEWS

आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानाच्या विष्णू निवासमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला. यापूर्वीदेखील धार्मिक स्थळ आणि कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्याबाबत वाचा, सविस्तर.

stampede death news
चेंगराचेंगरी दुर्घटना (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2025, 10:48 AM IST

Updated : Jan 9, 2025, 1:06 PM IST

हैदराबाद- तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं (stampede death news) गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. धार्मिक स्थळ आणि कार्यक्रमात यापूर्वी चेंगराचेंगरीच्या कधी दुर्घटना घडल्या आहेत? अशा चेंगराचेंगरीच्या दुर्घटना कशामुळे घडतात? त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

कशामुळे धार्मिक उत्सव अथवा मंदिरांमध्ये होते चेंगराचेगरी-भारतातील धार्मिक कार्यक्रम आणि मंदिरामधील चेंगराचेंगरीच्या कारणांचा अभ्यास केला असता काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. बऱ्याचदा अशा ठिकाणी अपुऱ्या आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे असुरक्षितता असते. अनेकदा दुर्गम ग्रामीण भागात, डोंगराळ प्रदेशात, टेकड्यांवर किंवा योग्य मार्ग नसलेल्या नदीकाठावर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. अशा ठिकाणी असलेला तीव्र उतार, स्थळाची असमान भूरचना, निसरडी जमीन, अरुंद मार्ग, एकाच ठिकाणी भाविक एकत्रित येणे या कारणांमुळे धार्मिक कार्यक्रमामध्ये धोके निर्माण होतात. त्यातून चेंगराचेंगरीच्या घटना घडतात.

कोठे होतात चेंगराचेंगरीच्या दुर्घटना-धार्मिक सामूहिक कार्यक्रम घेताना अनेकदा जोखीम व्यवस्थापन करण्याकडं दुर्लक्ष करण्यात येतं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शननं (IJDRR) प्रकाशित केलेल्या 2013 च्या अभ्यासात असं दिसून आलं की, भारतातील 79 टक्के चेंगराचेंगरीचे ठिकाणे हे धार्मिक मेळावे आणि तीर्थयात्रेची ठिकाणे आहेत. विकसित देशांमध्ये बहुतेक चेंगराचेंगरी स्टेडियम, संगीत मैफिली आणि नाईट क्लबच्या ठिकाणी होतात. परंतु भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये गर्दीच्या आणि चेंगराचेंगरीच्या बहुतेक दुर्घटना धार्मिक स्थळांवर होतात, असे केरळ सरकारच्या भू आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक फैसल टी. इलियास यांनी सांगितले. ते आयजेडीआरआर अभ्यासाचे लेखकदेखील आहेत.

धार्मिक कार्यक्रम आणि तीर्थस्थळांजवळ घडलेल्या दुर्घटना (Major Stampedes At Temples In India)

  • 4 जुलै 2024- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन किमान 27 जणांचा मृत्यू झाला.
  • 25 मार्च 2024 : केरळमधील कोल्लम येथील कोट्टनकुलंगरा मंदिरात सकाळी चेंगराचेंगरीत एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
  • 17 फेब्रुवारी 2024 : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पूजनीय श्रीजी मंदिरात होळीपूर्वी झालेल्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत किमान सहा भाविक बेशुद्ध पडले. तर काही जण जखमी झाले.
  • 24 डिसेंबर 2023 : मथुरा येथील बांके बिहारी मंदिरात गर्दीमुळे गुदमरून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला.
  • 20 ऑगस्ट 2022 : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत एका 65 वर्षीय पुरूषाचा आणि 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर सात भाविक जखमी झाले.
  • 1 जानेवारी 2022: जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला. तर डझनभराहून अधिक जण जखमी झाले.
  • 21 एप्रिल 2019 : तामिळनाडूच्या त्रिची येथील मंदिर उत्सवात चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. मंदिरातील मूर्तीसमोर पुजाऱ्याकडून नाणी गोळा करण्याचा कार्यक्रम खूप लोकांनी 'पिडिक्कासु' घेण्याचा प्रयत्न केल्यानं चेंगराचेंगरी झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
  • 10 ऑगस्ट 2015: झारखंडमधील देवघर शहरातील एका मंदिरात चेंगराचेंगरीत किमान 11 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाले. दरवाजे उघडल्यानंतर काही वेळातच भाविक इमारतीकडे धाव घेतल्यानंतर झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात चेंगराचेंगरी झाली, असे अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले.
  • 14 सप्टेंबर 2014: आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे 'पुष्करम' उत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. गोदावरी नदीच्या काठावरील एका प्रमुख स्नानस्थळावर चेंगराचेंगरीत 27 यात्रेकरूंचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाले.
  • 25 ऑगस्ट 2024: मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका मंदिरात अफवेमुळे चेंगराचेंगरी झाल्यानं दहा यात्रेकरू ठार आणि 20 हून अधिक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टेकडीची 'परिक्रमा' (प्रदक्षिणा) करत असताना ही चेंगराचेंगरी झाली.
  • 13 ऑक्टोबर 2013: मध्य प्रदेशातील दातिया येथील रतनगढ हिंदू मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 89 जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जखमी झाले. पूल कोसळत असल्याची अफवा पसरल्यानं चेंगराचेंगरी झाल्यचं चंबळ रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) डी के आर्य यांनी सांगितलं.
  • 14 जानेवारी 2011: केरळमधील सबरीमाला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 106 यात्रेकरू ठार तर 100 हून अधिक जखमी झाले.
  • 4 मार्च 2010 : उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 63 जणांचा मृत्यू झाला. लोक मोफत कपडे आणि अन्न घेण्यासाठी जमले होते. भाविकांच्या गर्दीमुळे त्या ठिकाणचा एक मुख्य दरवाजा कोसळल्यानं चेंगराचेंगरी झाली.
  • 30 सप्टेंबर 2008 : राजस्थानमधील जोधपूरमधील मेहरानगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या चामुंडा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत 244 लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. मंदिरातील देवतेकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर ही घटना घडली.
  • 3 ऑगस्ट 2006: हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात चेंगराचेंगरीत सुमारे 150 भाविकांचा मृत्यू आणि 400 हून अधिक जखमी झाले. जवळच्या डोंगरमाथ्यावरून दरड कोसळल्याच्या आणि दगड कोसळल्याच्या अफवांमुळे भाविकांमध्ये भीती पसरल्यानं चेंगराचेंगरी झाली.
  • 26 जानेवारी 2005 : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई जवळील मंदेर देवी मंदिरात वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या निघाल्यानं घाबरलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडल्याने 291 जणांचा मृत्यू झाला. तर 200 हून अधिक जण जखमी झाले.
  • 27 ऑगस्ट 2003 : नाशिक कुंभातील पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू झाला. तर 140 जण जखमी झाले.

चेंगराचेंगरी टाळण्याकरिता काय आहेत उपाययोजना-आयआयएमए अहमदाबादनं (IIMA Ahmedabad) मोठ्या कार्यक्रमामध्ये गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत. यात गर्दी नियंत्रित करण्यासाठी पर्यायी मार्ग असणे आणि व्हीआयपी अभ्यागतांची काळजी घेण्यासाठी योजना तयार करणे यांचा समाविष्ट आहे. आपत्कालीन परिस्थिती पर्यायी मार्ग असणे आणि वेळप्रसंगी अधिकाऱ्यांनी व्हीआयपींना प्रवेश नाकारण्यास मागेपुढे पाहू नये, आयआयएमए अहमदाबादनं अभ्यास अहवालात म्हटलं आहे. जनरेटर, सर्किट ब्रेकर अशा गोष्टी गर्दापासून दूर ठेवाव्यात. आवश्यक असल्यास त्यांना कुंपण आणि सुरक्षा असावी, असा आयएमएनं सल्ला दिला आहे.

हेही वाचा-

  1. तिरुपती मंदिरात टोकन घेताना चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, पंतप्रधानांसह चंद्राबाबू नायडुंनी व्यक्त केला शोक
  2. तिरुपती : तिकीट काउंटरवर चेंगराचेंगरी, किमान चार जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती
Last Updated : Jan 9, 2025, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details