नवी दिल्ली :काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचा राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध विजय झाला आहे. या अगोदर सोनिया गांधी सहावेळा लोकसभेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. सोनिया गांधी यांनी (दि. 15 फेब्रुवारी) रोजी राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोनिया गांधींनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार नाही, असं या आधीच जाहीर केलं होतं.
रायबरेलीतून प्रियंका गांधी लोकसभा मैदानात? : गेल्या अनेक दिवसांपासून सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू होती. कारण प्रकृती बरी नसल्यामुळे सोनिया गांधींना लोकसभेतील प्रचार, रॅली आणि सभा या गोष्टी शक्य नसल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे सोनिया यांनी राज्यसभेवर जावं, असं काँग्रेसमधील अनेकांचं मत होत. तसंच, सोनिया स्वत:ही लोकसभा लढवण्यास इच्छूक नव्हत्या.
अद्याप काँग्रेसकडून तशी माहिती नाही : उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सोनिया गांधी या मतदारसंघातून सलग सहावेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. परंतु, त्या यावेळी राज्यसभेवर गेल्या असल्यानं आता रायबरेली येथून लोकसभेची उमेदवारी कोणाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गेली 66 वर्षांपासून काँग्रेसच : रायबरेलीमधून गेली अनेक दशकं या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता ही जागा प्रत्येकवेळी काँग्रेसकडं आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे.