बंगळुरू Karnataka Sexual Abuse Case : अनेक महिलांचं कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. मात्र बंगळुरू विमानतळावर दाखल होताच त्यांना एसआयटीनं शुक्रवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या. प्रज्वल रेवन्ना जर्मनीहून बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर लगेच एसआयटीनं त्यांना अटक केली. यावेळी बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष तपास पथकानं (एसआयटी) मोठा फौजफाटा तैनात केला. प्रज्वल रेवन्ना यांना जर्मनीतील म्युनिकहून परतल्यानंतर लगेच त्यांना सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं.
महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वल रेवन्ना अटक :जेडीएसचे निलंबित नेते तथा खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर ते जर्मनीला गेले होते. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे भारतात परतले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांना विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी ) ताब्यात देण्यात आलं. खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध न्यायालयीन वॉरंट प्रलंबित होते. औपचारिकतेनंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना यांना अटक केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंटरपोलनं काढली होती ब्लू कॉर्नर नोटीस :बंगळुरूच्या विमानतळावर आल्यानंतर एसआयटीनं प्रज्वल रेवन्ना यांना ताब्यात घेतलं. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचं कथितरित्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षेमुळे लगेच दुसऱ्या मार्गानं एसआयटीनं बाहेर काढलं. प्रज्वल रेवन्ना यांनी 27 मे रोजी एक व्हिडिओ जारी करत आपण 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. प्रज्वल रेवन्ना हे 27 एप्रिलला जर्मनीला रवाना झाले होते. त्यानंतर सीबीआय मार्फत एसआयटीनं केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलनं प्रज्वल रेवन्ना यांच्याविषयीची माहिती मागणारी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली.
प्रज्वल रेवन्ना यांनी फेटाळले कथित लैंगिक शोषणाचे आरोप :जेडीएसचे निलंबित नेते प्रज्वल रेवन्ना यांच्यावर कथित लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या कथित लैंगिक शोषणाचे पेन ड्राईव्ह बाहेर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यानंतर एसआयटीनं दाखल केलेल्या अर्जानंतर विशेष न्यायालयानं प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. कर्नाटक सरकारनं त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केंद्र सरकारकडं केली. त्यामुळे केंद्र सरकारनं प्रज्वल रेवन्ना यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. केंद्र सरकारनं लैंगिक शोषणाच्या कथित आरोपावरुन कर्नाटक सरकारनं मागणी केल्यानुसार त्यांचा पासपोर्ट का रद्द करू नये, असं या नोटीसमध्ये बजावलं. मात्र प्रज्वल रेवन्ना यांनी आपल्यावरील कथित लैंगिक शोषणाचे आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं. हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावा त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओत केला.
हेही वाचा :
- सेक्स स्कँडलनंतर प्रज्वल रेवन्ना पहिल्यांदाच आला समोर; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला, "31 मे रोजी सकाळी...." - Prajwal Revanna Video
- सेक्स स्कँडल प्रकरणात एचडी रेवन्नाला एसआयटीनं घेतलं ताब्यात, प्रज्वलविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस - Prajwal Revanna sex scandal
- कथित सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवन्नाविरोधात ग्लोबल लुकआउट नोटीस, अटकेची टांगती तलवार कायम - Prajwal Revanna Lookout Notice