नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठा झटका बसलाय. मतदानाच्या पाच दिवस आधी पक्षाच्या सात आमदारांनी राजीनामे दिले आहेत. पक्षानं आमदारांची तिकिटं कापल्यानं त्यांच्यात नाराजी होती. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट नाकारण्यात आल्यानं नाराज होऊन 'आप'च्या सात विद्यमान आमदारांनी राजीनामा दिला.
- भावना गौर- पालम
- बीएस जून - बिजवासन
- पवन शर्मा - आदर्श नगर
- मदनलाल - कस्तुरबा नगर
- राजेश ऋषी - जनकपुरी
- रोहित मेहरौलिया - त्रिलोकपुरी
- नरेश यादव - मेहरौली
अरविंद केजरीवालांना लिहिलं पत्र : 'आप'च्या या सात विद्यमान आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दोन पानी पत्र लिहिलं असून, राजीनामा देण्याचं कारणही त्यात सांगितलं. नरेश यादव यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "भारतीय राजकारणातून भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराविरोधातील अण्णांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र, आता आम आदमी पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलाय. प्रामाणिकपणाच्या राजकारणासाठी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पण, आज प्रामाणिकपणा कुठेच दिसत नाही."