रायपूर Security Lapse of CM Vishnudeo Sai : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आलीय. एक व्यक्ती मुख्यमंत्री विष्णू देव साय यांना भेटण्यासाठी आली होती, असं सांगण्यात येतंय. हा व्यक्ती व्हीआयपी कारमध्ये पिस्तूल घेऊन रायपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. मात्र झडती दरम्यान त्या व्यक्तीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलंय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कसूर केल्याप्रकरणी तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे.
मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या सुरक्षेत त्रुटी : मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा एसपी प्रफुल्ल ठाकूर म्हणाले, "रायपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या रुममध्ये जाण्यापूर्वी, त्याची झडती घेण्यात आली. यादरम्यान त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यानंतर 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. या प्रकरणाचा तपास सुरू असून या प्रकरणी आणखी काही सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जाऊ शकतं."