नवी दिल्ली-माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आल्यानं शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत संतप्त झाले. "पवारसाहेब आम्हालाही राजकारण कळते," असा टोला खासदार राऊत यांनी शरद पवारांना लगावला. ते दिल्लीत माध्यमांशी ( Sanjay Raut News) बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, " शरद पवारांनी शिंदेचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शाहांचाच सत्कार केला. गद्दारांना असे सन्मान देणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे. पवारांनी शिंदेच्या कार्यक्रमाला जायला नको होतं. राज्याचं राजकारण विचित्र दिशेनं चाललं आहे. ठाण्याचा विकास हा शिवसेनेनं केला. शरद पवारांना ठाण्याबाबत चुकीची माहिती आहे. पवारांबाबत आम्ही आमच्या पक्षाच्या भावना मांडल्या आहेत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली सुरू आहे. आता शिंदेसारखे आंतरराष्ट्रीय दलाल पवार साहेबांसोबत आहेत."
मराठीची काय सेवा सुरू आहे-"माझा साहित्य संमेलन आयोजकांना सवाल आहे. तुम्ही मराठीची काय सेवा करत आहात? मराठीच्या मानेवर पाय देणाऱ्यांचा सत्कार होत आहे. मला साहित्य संमलेनाचा निमंत्रण दिलेलं आहे. पण, मी संमेलनाला जाणार नाही. आयोजकांना पैशाची कमतरता असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यायला हवं होतं. त्यांना लोकवर्गणी करून पैसे दिले असते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या हस्ते होणार आहे. त्यांनीदेखील मी पत्र लिहिणार आहे. दिल्लीच्या राजधानीत महाराष्ट्राचा घोर अपमान होत आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
महाराष्ट्राला नक्कीच वेदना झाल्या-पुढे राऊत म्हणाले, " शरद पवारांनी कार्यक्रमाला जायला नको होते, ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार? राजकारणात कुणी कोणाचा मित्र, शत्रू नसतो, ही ठीक आहे. पण, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आपण महाराष्ट्राचे शत्रू मानतो, त्यांना हातून पुरस्कार देणं हा राज्याच्या अस्मितेला धक्का आहे. शिवसेना तोडून महाराष्ट्र कमजोर केलेल्यांचा तुम्ही सन्मान केला. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण कळतं. पण, काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असत्या. अजित पवारांबरोबर तुमचं गुफ्तगू हे वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणानं होत असेल. तरी त्यांनी राष्ट्रवादी फोडल्यानं आम्ही आमचं भान टाकून पावले टाकत असतो."
तडकाफडकी प्रतिक्रिया दिली असावी-संजय राऊतांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला राज्यात राजकीय पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी एक्स मीडियात पोस्ट करत मत व्यक्त केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, " दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्यानं दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली. सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक आणि सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण, मागील दोन-तीन वर्षात भाजपानं कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊतांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी!"
अमोल मिटकरींची टीका : संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवारात नाक खुपसु नये, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राऊतांना दिला. संजय राऊतांमुळेच ठाकरे कुटुंब फुटले, त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे वेगळे झाले, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचे कारण देखील राऊतच आहेत, असा आरोप त्यांनी केला. आपल्याकडे चार बोटे असताना दुसरीकडे बोट दाखवु नये, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी परिवारात त्यांनी नाक खुपसायचे कारण नाही, घर कोणी फोडले ते आम्ही पाहून घेऊ, मात्र तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले त्याचा जाब तुम्हाला महाराष्ट्र नक्कीच एक दिवस विचारेल, असे मिटकरी म्हणाले.
महेश तपासे यांची प्रतिक्रिया : पुरस्कार देणारी सामाजिक संस्था पवारांची नाही. पुरस्कार कुणाला द्यायचा याचा निर्णय संबंधित संस्थेने घेतला आहे. त्याठिकाणी शरद पवार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, त्यामुळे संजय राऊतांनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या राजकारणात दुर्मीळ दृश्य-संजय राऊत हे रोज भाजपासह महायुती आणि मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करतात. त्यांच्या टीकेला भाजपाकडूनदेखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतं. मात्र, राऊतांनी प्रथमच शरद पवारांवर हल्लाबोल केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्याच्या राजकारणात हे दुर्मीळ दृश्य हे पाहायला मिळत आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवरील टीकेवरून खासदार राऊतांचा समाचार घेतला. मंत्री बावनकुळे म्हणाले, "संजय राऊत यांना महाराष्टाची संस्कृती समजली नाही. माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं किंवा त्यांना एखाद्या पुरस्कारानं निवड करणं ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार हे संजय राऊत यांना सल्ला देत असतील, असा आमचा समज होता. आता संजय राऊत हे शरद पवारांना सल्ला द्यायला लागलेत का? महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केल्याचं शरद पवार यांनी मान्य केलं आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी शिकलं पाहिजे," असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
दिल्लीतील कार्यक्रमात पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक-माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार मंगळवारी दिल्लीत प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शरद पवारांनी महायुतीचे नेते एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे हे अलिकडच्या काळातील नागरी प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांनी ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचं काम केलं. पक्षापुरता मर्यादित विचार न करता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्याचे आणि जनतेचे प्रश्न सोडविले. त्यांच्या कामांची महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चितपणं नोंद होईल."
हेही वाचा-
- "...तर आम्ही पुढील लोकसभा लढवायची कशी?", दिल्ली निवडणूक निकालावरुन संजय राऊतांचा सवाल
- "शिवसेनाप्रमुख नाहीत या आनंदात भाजपाने निवडणुका लढवल्या",' संजय राऊत म्हणतात, "शिंदेंचं ऑपरेशन अमित शाह..."
- "...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला