नवी दिल्ली Sadhguru Jaggi Vasudev Brain Surgery : अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या डोक्याला सूज आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ब्रेन सर्जरी करण्यात आली. सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मागील काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. मात्र प्रचंड डोकेदुखी असूनही त्यांनी त्यांचे सामाजिक उपक्रम सुरूच ठेवले होते. विशेष म्हणजे 8 मार्चचा महाशिवरात्रीचा उत्सवही त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मात्र 15 मार्चला त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर विनीत सुरू यांचा सल्ला घेत ते रुग्णालयात दाखल झाले.
रक्तस्त्राव झाल्यानं डॉक्टरांनी घेतला शस्त्रक्रियेचा निर्णय :डॉक्टर विनीत सुरी यांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी सद्गुरू जग्गी वासुदेव यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार सद्गुरू जग्गी वासुदेव दिल्लीतील अपोलो रुग्ण्यालयात दाखल झाले होते. डॉक्टर विनीत सुरी यांना सब-ड्युरल हेमेटोमाचा संशय असल्यानं सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूचा एमआरआय चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याचं आढळून आलं. 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीत हा रक्तस्राव झाल्याचं स्पष्ट झालं. त्यासह नव्यानंही रक्तस्राव झाल्याचं उघड झालं. त्यामुळे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली.
प्रचंड वेदना होत असतानाही घेतली बैठक :अद्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. मात्र त्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक उपक्रम सुरूच ठेवले होते. 15 मार्चला त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी " गेल्या 40 वर्षात मी एकही बैठक चुकवली नाही. प्रचंड त्रास असतानाही मी औषधी घेऊन मी बैठक पूर्ण केली. त्यामुळे या बैठकीला खंड पडता कामा नये," असं स्पष्ट करत त्यांनी बैठक पूर्ण केली. त्यांना डाव्या पायात अशक्तपणा आणि वारंवार उलट्यांचा त्रास असतानाही त्यांनी सामाजिक उपक्रम सुरूच ठेवले होते. अखेर त्यांना 17 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
माझ्या डोक्यात डॉक्टरांना काहीच सापडलं नाही :डोक्यावर गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली. "डॉक्टरांना माझ्या मेंदूत गाठ असल्याचा संशय होता. मात्र डॉक्टरांना माझ्या मेंदूत काहीच सापडलं नाही. सगळं रिकामं आहे" असं सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी शस्त्रक्रियेनंतर हसत हसत वृत्तसंस्थेला सांगितलं.
हेही वाचा :
- Sadhguru Jaggi Vasudev: सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तक्रार दाखल, कार्यक्रमात साप दाखवल्याचा आरोप
- Teachers Day 2022: या एका घटनेने जग्गी वासुदेव यांचे बदलं आयुष्य आणि ते झाले सद्गुरू