वायनाड: काँग्रेसनं वायनाड लोकसभा मतदारसंघाबरोबर पलक्कड आणि चेलाक्करा या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. प्रियका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असेल. केरळ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल ममकूथिल हे पलक्कड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अलाथूरचे माजी खासदार रम्या हरिदास यांची चेलाक्करा यांच्यासाठी निवड करण्यात आली आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीनं (केपीसीसी) तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीला हायकमांडनं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यापूर्वी राज्य नेतृत्वाच्या निर्णयानंतर उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे सांगितलं होते. प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधील उमेदवारीची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. यापूर्वीच जुलैपासून वायनाडमधील निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू होत्या.
- वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) उपाध्यक्ष ओव्ही अप्पाचन यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, प्रियंका गांधी यांना वायनाड मतदारसंघात किमान 8 लाख मते मिळावीत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. काँग्रेसनं स्थानिक काँग्रेस नेत्यांची टीम तयार केली आहे.
- राहुल गांधींच्या बहुमतांची आकडेवारी-राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडसह लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना 7 लाख 6 हजार 367 मते मिळाली होती. या वर्षीदेखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत वायनाडमध्ये विजय मिळवला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे बहुमत थोडे कमी झाले. यावेळी राहुल यांना 6 लाख 47 हजार 445 मते मिळाली आहेत.