नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. याच अभिभाषणावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली होती. “राष्ट्रपती यांची भाषण करता करता दमछाक झाली होती. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दिली. या प्रतिक्रियेनंतर आता प्रत्युत्तर यायला लागलं असून, राष्ट्रपती कार्यालयातूनही यावर उत्तर देण्यात आलंय. सोनिया गांधींचं विधान अस्वीकार्य आहे, असं कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रपती अजिबात थकल्या नव्हत्या :"राष्ट्रपती भवन स्पष्ट करू इच्छिते की, अभिभाषणावेळी राष्ट्रपती अजिबात थकल्या नव्हत्या. उपेक्षित समुदायांसाठी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी बोलणं थकवणारं असू शकत नाही. राष्ट्रपती कार्यालयाचा असा विश्वास आहे की, कदाचित या नेत्यांनी हिंदीसारख्या भारतीय भाषांमधील वाक्प्रचार आणि भाषण समजलं नसेल आणि त्यामुळं त्यांचा गैरसमज निर्माण झाला असेल. कोणत्याही परिस्थितीत अशा टिप्पण्या वाईट, दुर्दैवी आणि पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत”, असं राष्ट्रपती भवनातून स्पष्ट करण्यात आलं.
राष्ट्रपती भवनकडून स्पष्टीकरण :राष्ट्रपती भवनानं निवेदनात म्हटलं आहे की, "माननीय राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी उच्च पदाच्या प्रतिष्ठेला स्पष्टपणे धक्का देणाऱ्या टिप्पण्या केल्या आहेत. या नेत्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती खूप थकल्या होत्या आणि त्यांना बोलता येत नव्हते."