नवी दिल्ली MODI on RUSSIA AUSTRIA TOUR: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार 8 जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत असताना म्हणाले की, "रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळं भारताला या राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. पुढील तीन दिवसांत मी रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असेन. या दोन्ही देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी असेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जुलै रोजी मॉस्कोमध्ये असतील. त्यानंतर ते ऑस्ट्रियाला रवाना होतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी रशियात होणाऱ्या 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी माहिती दिली आहे. वार्षिक शिखर परिषदेमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना संरक्षण, व्यापार संबंध, गुंतवणूक संबंध, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाण-घेवाण यासह द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेता येणार आहे.