नवी दिल्ली : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहेत. फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून ते अमेरिकेत पोहोचले आहेत. अमेरिकेत, पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दोन्ही स्तरांवर द्विपक्षीय बैठका घेतील.
मोदींचं जल्लोषात स्वागत : ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर, त्यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथे परदेशी नेते असतील. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिटचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही केली. पंतप्रधान मोदींचं अमेरिकेत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोदींना पाहण्यासाठी अनेक भारतीय विमानतळाबाहेर तसंच वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले होते.
राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकांसोबत बैठक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या (DNI) संचालक तुलसी गबार्ड यांच्यासोबत बैठक घेतली. पंतप्रधान मोदी आणि गबार्ड यांनी भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली. पीएम मोदी आणि गॅबार्ड यांनी हस्तांदोलन करून एकमेकांचं स्वागत केलं. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात गबार्ड यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून शपथ घेतल्याच्या काही तासांनंतर ही बैठक झाली.
दोन्ही देशांमधील मैत्री वृद्धिंगत :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवर तुलसी गॅबार्ड यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान काढलेले फोटो शेअर केले आहेत. तुलसी गॅबार्ड यांची गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केलं. तसेच, दोन्ही देशांमधील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल, यावर चर्चा झाल्याचं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल, यासंदर्भातही यावेळी द्विपक्षीय चर्चा झाली.
हेही वाचा -एआय मानवतेसाठी लिहतंय कोड, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पॅरिसमध्ये प्रतिपादन