नवी दिल्ली :राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब करण्यात आली. तर लोकसभेतही विरोधकांनी प्रचंड आक्रमक होत कथित अदानी आणि मणिपूर प्रश्नांवरुन मोठा हल्लाबोल केला. त्यामुळे दुपारी दोन वाजतापर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली. यावेळी प्रियंका गांधी आणि कपिल सिब्बल यांनी सरकारवर निशाना साधला.
राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब :आज सकाळी संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यसबेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला. विरोधकांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावरुन चांगलंच वातावरण तापलं. विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर टीका केली. जर विरोधकांनी सभापतीच्या प्रतिष्ठेवर हल्ला केला तर सत्ताधारी त्याबाबत विरोधकांना पुरुन उरतील. शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखली हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे, असं किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस भारतविरोधी शक्तीसोबत उभा असलेला पक्ष आहे : 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला जर सभापतींचा आदर करता येत नसेल, तर तुम्हाला सभागृहाचे सदस्य राहण्याचा काहीच अधिकार नाही. आम्ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाची शपथ घेतली आहे, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. यावेळी किरेन रिजिजू यांनी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस यांच्यातील कथित संबंधांचा मुद्दाही उपस्थित केला. काँग्रेस भारतविरोधी शक्तींसोबत उभी असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
सोरोस आणि काँग्रेसचे काय संबंध आहेत, हे उघड झालं पाहिजे ? :याबाबत बोलताना किरेन रिजिजू म्हणाले की, "भारताच्या विरोधातील शक्तींच्या पाठीशी तुम्ही उभे आहात. सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली. असे सभापती मिळणं अवघड आहे. त्यांनी नेहमीच नागरिकांच्या हिताची, संविधानाच्या रक्षणाची भाषा केली. नोटीसचं नाटक आम्ही होऊ देणार नाही. अगोदर उद्योगपती सोरोस आणि काँग्रेसचे काय संबंध आहेत हे उघड झाले पाहिजे. काँग्रेसनं देशाची माफी मागितली पाहिजे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा :
- इंडिया आघाडीत मतभेद! राहुल गांधींबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
- ईव्हीएम विरोधात आंदोलन पेटणार? शरद पवारांनंतर आता राहुल गांधीही मारकडवाडीला जाणार
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : कथित अदानी प्रकरणावरुन 'इंडिया' आघाडी आक्रमक, ममता बॅनर्जींच्या टीएमसीची आंदोलनाकडं पाठ