नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मागील काही दिवस विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज अनेक वेळा तहकूब करण्यात आलं. आज सकाळपासून कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी आज संसदेत कथित अदानी लाच प्रकरणावरुन गदारोळ केला. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात वायनाड लोकसभा मतदार संघातून पोट निवडणुकीत जिंकलेल्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा या देखील सहभागी झाल्या. मात्र दुसरीकडं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं या आंदोलनाकडं पाठ फिरवली.
संसदेच्या परिसरात 'इंडिया' आघाडीचं आंदोलन :आज सकाळी संसदेच्या परिसरात इंडिया आघाडीच्या वतीनं संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. कथित अदानी लाच प्रकरणाची जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदनात येण्यासाठीही घोषणाबाजी करण्यात आली.