नवी दिल्ली- अमेरिकेत बेकायदेशीरपणं राहणाऱ्या भारतीयांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे माणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. त्यांनी प्रस्तावात म्हटलं की, अमेरिकेनं भारतीय नागरिकांना अमानुष आणि अपमानास्पद पद्धतीने हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे. निर्वासितांना बेड्या घालून सैन्यदलाच्या विमानातून आणण्यात आले. हे त्यांच्या आत्मसन्मानाचं स्पष्ट उल्लंघन आहे.
बेकायदेशीरपणं राहणाऱ्या भारतीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कामकाजात अडथळा आणू नये-लोकसभा अध्यक्षांचे आवाहन- लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय नागरिकांना परत पाठवण्याच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजात अडथळा आणू नका, असे विरोधी पक्षाच्या खासदारांना आवाहन केलं. हद्दपारीचा विषय परराष्ट्र मंत्रालयाचा आहे. त्याची सरकारनं दखल घेतली आहे. प्रश्नोत्तराचा तास हा महत्त्वाचा आहे. त्यामध्ये नागरिकांच्या समस्येवर खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर देण्यात येते, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
विरोधकांनी हातकड्या घालून केला निषेध-अमेरिकेतून कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली.काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव, काँग्रेसचे खासदार गुरजीत सिंह औजला आणि काही इतर नेत्यांनी हातकड्या घालून निषेध केला.
परराष्ट्रमंत्री संसदेत सादर करणार निवेदन-विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज विस्कळित होत आहे. केंद्र सरकारकडून भारतीयांच्या हद्पारीबाबत संसदेत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज दुपारी २ वाजता संसदेत निवेदन देणार आहेत, असे केंद्रीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले. अमेरिकेतून कथित बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याच्या मुद्द्यावर जयशंकर विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत.
हेही वाचा-
- लोकसभेत पंतप्रधानांची काँग्रेसवर जोरदार बॅटिंग; म्हणाले, "दिल्लीतून रुपया निघायचा, 15 पैसे..."
- "शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदार..." राहुल गांधींची महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर टीका