नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वर्ष २०२४- २५ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी देशाचा आर्थिक गाडा पुढील वर्षभरात कसा हाकणार याचा लेखाजोखा मांडला. यामध्ये वैयक्तिक करदात्यांना काहीतरी मिळले अशी अपेक्षा होती. मात्र यावर्षीही वैयक्तिक करदात्यांना फारसं काही मिळालं नाही असंच दिसून येतंय.
नवीन कर प्रणालीनुसार वर्ष २०२४-२५ साठी खालील प्रमाणे कर भरावा लागेल.
- ० ते ३ लाख रुपये वार्षिक उत्पन्नासाठी ० टक्के कर
- ३ लाख ते ७ लाख रुपये वार्षिक उत्पन्नासाठी ५ टक्के कर
- ७ लाख ते १० लाख वार्षिक उत्पन्नासाठी १० टक्के कर
- १० लाख ते १२ लाख वार्षिक उत्पन्नासाठी १५ टक्के कर
- १२ लाख ते १५ लाख वार्षिक उत्पन्नासाठी २० टक्के कर
- १५ लाख रुपयांच्यावरील उत्पन्नासाठी ३० टक्के कर
नवीन कर प्रणाली साठी सर्वसामान्यांना स्टँडर्ड डिडक्शन ५०००० वरुन ७५००० करण्यात आलं आहे. तर पेन्शनरसाठी १५००० वरुन २५०००० वर नेण्यात आलं आहे. जुन्या कर प्रणालीसंदर्भात यावेळी अर्थंमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक अवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं स्पष्ट होत आहे.
यावेळी आयकर व्यवस्था सुरळीत करण्यासाच्या उपाययोजना करण्यासाठी कायद्यातच सुधारणा करणार अशी घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. त्यासाठी सहा महिने विद्यमान कर कायद्याचा अभ्यास करुन त्यावर अहवाल तयार करणार असल्याचं त्या म्हणाल्या. टीडीएसमध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे. २ तृतियांश वापरकर्त्यांनी नवीन कर प्रणालीचा अवलंब केल्याचं निर्मला सीतारामण यांनी म्हटलंय.
आयकरासंदर्भात इतर महत्वाच्या घोषणांमध्ये, टीडीएस वेळेत भरला नाही तर गुन्हा मानला जाणार नाही. ई कॉमर्स वरील कर १ टक्क्यावरुन ०.१ टक्क्यावर आणण्याचा प्रस्ताव आहे. कॉर्पोरेट टॅक्स ४० टक्क्यावरुन ३५ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. एंजल टॅक्स बंद करण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.