रायपूर : छत्तीसगडमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळावरुन 20 ते 22 किलो आयईडी जप्त केलं आहे. ही घटना बिजापूर इथल्या उसूर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली आहे. हा आयईडी एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये ठेवण्यात आला. सकाळी 7.30 च्या दरम्यान 196 व्या बटालियनच्या जवानांनी या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (IED) शोध घेतला.
जवानांनी केलं आयईडी नष्ट :मोठा घातपात करण्याच्या इराद्यानं नक्षलवाद्यांनी आयईडी पेरुन ठेवलं होतं. मात्र नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेलं आयईडी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधून काढण्यात यश मिळवलं. यावेळी जवानांनी हे आयईडी स्फोटकं नष्ट केली आहेत. याबाबत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. हे आयईडी स्फोटकं शोधून नष्ट केल्यामुळे मोठा घातपात टळला आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.