वाराणसी- स्मशानभूमीत केवळ भयाण शांतता आणि जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर नातेवाईकांचा आक्रोश दिसून येतो. मात्र, सोमवारी महास्मशान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मणिकर्णिका घाटात वेगळचं चित्र पाहायला मिळालं. स्मशानभूमीत गीत-संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नगरवधुंनी पुढील जन्म चांगला मिळावा म्हणून नृत्य केलं. गेली साडेतीनशे वर्षांपासून मणिकर्णिका घाटात ही परंपरा आहे. यावेळी नगरवधुंनी आपल्या नृत्य आणि गायन करत कला दाखविली.
काशीमधील मणिकर्णिका घाटाच्या स्मशानभूमीत सोमवारी जळणाऱ्या चितांसमोर रडत असलेले लोक नव्हते. तर नगरवधुंचे नृत्य-गायन पाहणारे लोक दिसत होते. कारण, स्मशानभूमीत नगरवधुंनी नृत्य करण्याची वाराणशीत शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेमागे इतिहासातील एक घटना आहे.
काय आहे शेकडो वर्षांची परंपरा-चैत्र नवरात्र समाप्त होताच नगरवधुच्या नृत्य-गाण्याच्या कार्यक्रमाचे स्मशानभूमीत आयोजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मंदिराचे व्यवस्थापक गुलशन कपूर म्हणाले, "शेकडो वर्षांपूर्वी राजा मानसिंह यांनी दशाश्वमेध निमित्त राजवाडा बांधला होता. त्यावेळी त्यांनी महाश्मशाननाथ मंदिराचा जीर्णोद्धारदेखील केला होता. त्यावेळी महास्मशान मणिकर्णिका येथे काही कलाकारांना बोलाविण्यात आलं. मात्र, राजा मानसिंह यांच्याकडून स्मशानभूमीतील मंदिरात नववधुंना संगीत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, नगरवधुंनी कला सादर करण्याची राजा मानसिंह यांच्याकडे विनंती केली. पुढील जन्मी चांगली गती मिळावी, यासाठी ही विनंती असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर राजानं नगरवधुंना कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली.
विविध शहरांमधून येतात नगरवधू-महादेव हा संगीत आणि नृत्याचा देवता आहे. त्यामुळे कलेच्या सादरीकरणातून महादेव प्रसन्न होईल, अशी नगरवधुंची धारणा आहे. या जन्मात महादेवाची आराधान केल्यानंतर मोक्षप्राप्ती होईल, अशी नगरवधुंची श्रद्धा आहे. येथील महास्मशान मणिकर्णिकाघाटात सासाराम, दिल्ली आणि मुंबईसह विविध शहरांमधून नगरवधू येतात. नगरवधूमध्ये वेश्या आणि किन्नर यांचा समावेश होते. वाराणशी तथा काशीत देशभरातून भाविक काशीविश्वेशराचं दर्शन घेण्यासाठी येतात. पण, येथील नगरवधुंच्या स्मशानभूमीतील संगीत कार्यक्रमामुळे अनोखी परंपरा जपण्यात आली आहे.
हेही वाचा-
- अयोध्या फक्त एक झलक, मथुरा-काशी बाकी आहे - गोविंद देव गिरी