गुवाहाटी : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शनिवारी (16 नोव्हेंबर) इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेवर तात्पुरती बंदी घालण्यात आली.
जिरीबाम येथून सोमवारपासून बेपत्ता असलेल्या लोकांचे मृतदेह सापडल्याची माहिती पसरल्यानंतर इंफाळमध्ये हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, सरकारनं इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, थौबल, ककचिंग, कांगपोकपी, चुराचंदपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि ब्रॉडबँड आणि व्हीसॅट सेवा दोन दिवसांसाठी निलंबित केली आहे.
इंफाळमध्ये आमदारांच्या घरांवर हल्ला :शनिवारी इंफाळमध्ये आंदोलकांनी दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरांवर हल्ला केला. यामध्ये भाजपा आमदार आरके इमो सिंग, एल सुसिन्द्रो मेतेई, सपम कुंजकेश्वर सिंग आदींच्या घरांचा समावेश आहे. आमदारांच्या घरांवर जमावानं केलेल्या हल्ल्यानंतर इंफाळ पश्चिम प्रशासनानं जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : जिरीबाम जिल्ह्यातील सहा जण सोमवारी बेपत्ता झाले होते. त्यानंतर मणिपूर-आसाम सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ शुक्रवारी रात्री बेपत्ता लोकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले. यामध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. हे सहा जण मेईतेई समुदायातील असल्याचं सांगितलं जातंय. हे सर्वजण ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाले, तिथं सीआरपीएफ जवानांची काही सशस्त्र गुंडांशी चकमक झाली होती. यामध्ये दहा जण ठार झाले. तर कुकी आणि हमार गटांनी असा दावा केलाय की जे मारले गेले ते दहा जण 'ग्रामीण स्वयंसेवक' होते.
राहुल गांधी काय म्हणाले? : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मणिपूरमध्ये नुकताच झालेला हिंसक संघर्ष आणि सततचा रक्तपात यामुळं चिंता वाढली आहे. एक वर्षाहून अधिक काळ फाळणी आणि त्रासानंतर, प्रत्येक भारतीयाची आशा होती की केंद्र आणि राज्य सरकार सामंजस्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. तसेच तोडगा काढतील. मी पंतप्रधानांना पुन्हा एकदा मणिपूरला भेट देऊन या प्रदेशात शांतता आणि सुधारणांसाठी काम करण्याचं आवाहन करतो."
हेही वाचा -
- मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा
- मणिपूरमधील जातीय हिंसा: देशासह समाजाचे अपयश - ETHNIC VIOLENCE IN MANIPUR
- पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi