भारताच्या परराष्ट्र धोरणावर मणिशंकर अय्यर यांनी केले भाष्य जयपूर Mani Shankar Aiyar Statement : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. शुक्रवारी (2 फेब्रुवारी) जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये मणिशंकर अय्यर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य केलं. तसंच 'भारताचे पाकिस्तानबाबतचे सध्याचे धोरण समजण्यापलीकडे असून भारताकडे सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आहे, पण टेबलावर बसून बोलण्याची नाही', असं वक्तव्य त्यांनी केलंय. अय्यर यांच्या या विधानावरुन आता नव्या वादाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानशी संवाद साधला पाहिजे :यावेळी बोलत असताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, "आपण पाकिस्तानशी सतत संवाद साधला पाहिजे, कारण त्यांच्याशी चर्चा केली तरच प्रश्न सुटतील. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना बॅक चॅनल चर्चा झाल्या. तेव्हा पाकिस्तानला फक्त काश्मीरबद्दल बोलायचं होतं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासंदर्भात चार महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या, पण माहीत नाही का या मुद्द्यावर चर्चा नाही."
टेबलावर बसून बोलण्याची गरज : "आपण त्यांच्याशी बोललो नाही तर तोडगा कसा निघणार? त्यांना भारत सरकारचे धोरण समजत नाही. सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आहे, पण टेबलावर बसून बोलण्याइतकी हिंमत नाही. पाकिस्तानबाबत आपले धोरण मला आत्तापर्यंत समजलेलं नाही."
पाकिस्तानमध्ये खुल्या मनानं स्वागत : यादरम्यान त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते पाकिस्तानमध्ये महावाणिज्य दूतावासात होते तेव्हा त्यांचे स्वागत खुल्या मनाने करण्यात आले. त्यांना काय हवं आहे ते त्यांनी उघडपणे सांगितलं. हे खरे आहे की, पाकिस्तानातील भारताची सर्वात मोठी संपत्ती हे तेथील लोक आहेत, जे भारताला आपला शत्रू मानत नाहीत. जर तुम्ही भारत-पाकिस्तानचा इतिहास वाचलात, तर तुमच्या लक्षात येईल की तेथे लष्करी हुकूमशाही असतानाच प्रगती झाली, कारण त्यावेळी तेथील सरकार स्थिर होते."
हेही वाचा -
- मुंबईत काँग्रेसला दुसरा धक्का? सिद्दीकी पिता-पुत्र काँग्रेसचा 'हात' सोडण्याच्या तयारीत
- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी संपली, अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष
- 'त्या' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा