कोलकाता PM Modi Meets Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शुक्रवारी (1 मार्च) राजभवनात बैठक झाली. तसंच ही 'प्रोटोकॉल मीटिंग' असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. संदेशखालीमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरुन भाजपा आणि टीएमसी आमनेसामने आले आहेत. त्यामुळं या बैठकीवरुन अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.
7,200 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन : राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील सभेला संबोधित केल्यानंतर राजभवनात पोहोचले. रॅलीच्या काही मिनिटांपूर्वी, त्यांनी 7,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही केली.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?: बैठकीनंतर राजभवनातून बाहेर पडताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "आजची केवळ प्रोटोकॉल बैठक आहे. कोणताही उच्चपदस्थ अधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यक्ती शहरात आल्यावर भेटण्याची प्रथा असते. मोदी आले तेव्हा मी आरसीटीसी मैदानावर पोहोचू शकले नाही. त्यामुळं त्यांची भेट घेण्यासाठी मी इथं आले."